अभिनेत्री राखी सावंतच्या पतीला आज ओशिवरा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आदिल खान दुर्रानीच्या अटकेमागचं कारण आता स्पष्ट झालं आहे. राखीच्या तक्रारीमुळे आदिलला पोलिसांनी चौकशीसाठी आणल्याची माहिती समोर आली आहे. राखी सावंतनेच पती आदिल खान दुर्रांनीविरोधात ओशिवरा पोलिसांमध्ये तक्रार दिली होती.
राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला अटक
पतीच्या अटकेनंतर राखी सावंतने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तिने स्वतःच पोलिसांना फोन केल्याची माहिती दिली. राखीने सांगितलं की “सकाळी मला मारायला आदिल घरी आला होता. मीच नंतर पोलिसांत फोन केला होता, त्यानंतर पोलीस आले व त्यांनी तिथून त्याला अटक केली. तो मला फोन करून भेटण्यास विचारत होता. मी नाही म्हणत होते, तरीही तो घरी आला होता, म्हणून मी तक्रार दिली,” असं राखीने सांगितलं.
राखीने आईच्या मृत्यूलाही आदिलला जबाबदार धरलं आहे. “माझं त्याच्याशी पॅचअप झालेलं नाही. तो माझा पती आहे, मी त्याला घास भरवला म्हणून सगळं ठिक झालंय, असा त्याचा अर्थ होत नाही,” असंही राखी सावंतने सांगितलं.