प्रभास आणि क्रिती सेनॉन स्टार ‘आदिपुरुष’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाच्या दृष्यांवरुन आणि संवादावरुन जोरदार टीका करण्यात आली आहे. वाढत्या वादानंतर निर्मात्यांनी चित्रपटातील संवाद बदलले मात्र त्याचा म्हणावा तसा फायदा झाला नाही. बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. आता ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नवीन ऑफरची घोषणा केली आहे.
चित्रपटाच्या घटत्या कमाईमुळे निर्मात्यांनी थ्रीडी तिकिटांची किंमत आणखी कमी केली आहे. T-Series च्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने याबाबत घोषणा केली आहे. ‘आदिपुरुष’ची 3D तिकिट फक्त ११२ रुपयांना मिळतील’ अशी घोषणा करण्यात आली आहे. निर्मात्यांनी यापूर्वीही २२ जून आणि २३ जून या दोन दिवसांसाठी थ्रीडी तिकिटांची किंमत कमी केली होती. ‘आदिपुरुष’ची 3D तिकिटं फक्त १५० रुपयांमध्ये मिळतील, अशी घोषणा करण्यात आली होती. पण, त्याचा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले नव्हते.
T-Series ने सोशल मीडियावर पोस्ट करत तिकीट दर कमी केल्याची माहिती दिली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. . एकाने लिहिलं. बास करा रामाच्या नावावर किती भीक मागणार आहात. संवाद बदलून पूर्ण चित्रपट तर नाही सुधारला”. तर दुसऱ्याने लिहिलं आहे. “काही दिवस वाट बघा तिकिट १५ रुपयांचे होईल.” तर आणखी एकाने “तिकीटाचे दर ११२ केले तरी नाही चालणार”, अशी कमेंट केली आहे.

एका युजरने लिहिलं आहे. “एक असतात बेशरम, मग येतात धीट, मग महा धीट, त्यानंतर येतात आदिपुरुषचे निर्माते असं म्हणत, चित्रपटाच्या निर्मात्यांना टोमणा मारला आहे. तर दुसऱ्याने चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन खिल्ली उडवली आहे.


बॉक्स ऑफिसवर कमाईत घट
१६ जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ने पहिले तीन दिवस बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. मात्र, चौथ्या दिवसापासून चित्रपटाच्या कमाईत मोठी घट होण्यास सुरुवात झाली ती अद्याप कायम आहे. शनिवारी चित्रपटाने ५.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रविवारी चित्रपटाच्या कमाईत थोडी वाढ झाली आहे. रविवारी चित्रपटाने ६ कोटींची कमाई केली आहे. आत्तापर्यंत चित्रपटाची एकूण कमाई २७४.५५ कोटी पर्यंत पोहचली आहे.