बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या तिच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘आदिपुरुष’मध्ये क्रिती सीतामातेची भूमिका साकारणार आहे. २०१४ मध्ये रिलीज झालेल्या ‘हिरोपंती’ चित्रपटातून क्रितीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’, ‘मिमी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. आज क्रितीने बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे, परंतु एक काळ असा होता, जेव्हा तिला चित्रपट मिळत नव्हते. याविषयी एका मुलाखतीदरम्यान क्रितीने खुलासा केला आहे.
बॉलीवूडमधील स्ट्रगलबद्दल सांगताना क्रिती म्हणाली, “जेव्हा तुम्ही सिनेक्षेत्राशी संबंधित कुटुंबातून आलेले नसता तेव्हा या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कोणीही ओळखत नसते. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो. एक काळ असा होता, जेव्हा मला चित्रपट मिळत नव्हते, मला या इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला सिद्ध करायचे होते. ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटामुळे या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. माझ्या ‘लुका छुपी’ चित्रपटानेसुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. ‘बरेली की बर्फी’ आणि ‘लुका छुपी’ या दोन्ही चित्रपटांमध्ये मी लहानशा पण योग्य भूमिका केल्या होत्या. मात्र, यानंतर रिलीज झालेल्या ‘मिमी’ चित्रपटामुळे माझे संपूर्ण आयुष्य बदलले. ‘मिमी’ चित्रपटामुळे मला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या ठिकाणी पोहोचण्यासाठी मला आठ वर्षे लागली.”
हेही वाचा : विकी कौशलने उडवली साराची खिल्ली, अभिनेत्रीची शायरी ऐकून म्हणाला, “मला इथून पुढे…”
क्रितीने पुढे सांगितले, “मी माझ्या प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करते आणि माझा प्रत्येक चित्रपट मला वेगळी शिकवण देतो. त्यामुळे तुम्ही जे काम करता ते मनापासून करणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकता.”
दरम्यान, क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रभास हा प्रभू श्रीराम यांची, तर सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. ‘आदिपुरुष’चे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.