प्रभासच्या ‘आदिपुरुष’ हा बहुचर्चित चित्रपट शुक्रवारी १६ जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. तब्बल ५०० कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट किती कमाई करणार, याकडे प्रेक्षकांचं व ट्रेड अॅनालिस्टचं लक्ष लागलं होतं. अखेर चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. ट्रोलिंगचा सामना करुनही या चित्रपटाने दोन दिवसात बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे.
सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार, आदिपुरुष चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल ९५ ते ९८ कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटाने तेलुगू भाषेत सर्वाधिक कमाई केल्याचं म्हटलं जातंय. तेलुगूमध्ये ५८.५ कोटी, हिंदी ३५ कोटी आणि तमिळ ०.७ तर मल्याळम ०.४ कोटी रुपये कमावले असल्याचं त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.
तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने हिंदी भाषेत ३७ कोटी रुपयांची कमाई केली आहे तर तेलगू भाषेत २६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. T-Series च्या मते, आदिपुरुष चित्रपटाने दुस-या दिवशी जगभरात एकूण १०० कोटी रुपयांची कमाई केली आणि या चित्रपटाची जागतिक स्तरावर दोन दिवसांची कमाई २४० कोटी रुपये झाली आहे. दोन दिवसांच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने पठाणलाही मागे सोडले होते. दोन दिवसात पठाणने २१९ कोटी रुपयांची कमाई केली होती.
तर दुसरीकडे आंध्र बॉक्स ऑफिसने तेलगू राज्यातील या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी जाहीर केली आहे. तेलगू राज्यात या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २६ कोटी रुपये कमावले आहेत. तेलगू राज्यांमध्ये दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. पहिला चित्रपट ‘RRR’ आहे.
इंडियन एक्स्प्रेसचे चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता यांनी चित्रपटाला ५ पैकी २.५ स्टार दिले आहेत. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कलाकारांचे लूक्स, व्हीएफएक्स आणि डायलॉगवरून प्रेक्षक संतापले आहेत. त्यामुळे चित्रपट वादातही अडकला आहे. असं असूनही पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली. परिणामी हा विकेंड चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ करेल, असे अंदाज वर्तवले जात आहेत.