‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादात अडकला आहे. पण तरीही सुरुवातीचे तीन दिवस चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने जगभरात ३४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पहिल्या दिवशी जगभरात १४० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाचे नंतरच्या दोन दिवसाचे आकडे ५० कोटींच्या वर होते. त्यामुळे हा चित्रपट चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी किती कमाई करेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
हेही वाचा – सई ताम्हणकर बॉयफ्रेंड अनिश जोगबरोबर फिरतेय स्पेन; ‘त्या’ एका फोटोने उलगडलं गुपित
‘आदिपुरुष’ चित्रपटाने सोमवारी किती कमाई केली, त्याबद्दलचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घट झाली आहे. सुरुवातीच्या अहवालानुसार, चित्रपटाने सर्व भाषांमध्ये देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर फक्त २० कोटी रुपयांची कमाई केली. हिंदी भाषेत सोमवारी १० कोटी रुपयांची कमाई झाल्याचं म्हटलं जातंय. चित्रपटाचे भारतातील चार दिवसांचे एकूण कलेक्शन २४१.१० कोटी रुपये झाले आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही ट्वीट करत चित्रपटाच्या कमाईत सोमवारी मोठी घट झाल्याचं म्हटलं आहे.
रविवारी ६९.१० कोटी रुपये कमावणाऱ्या ‘आदिपुरुष’च्या कमाईत सोमवारी तब्बल ५० कोटी रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे पुढचा वीकेंड येईपर्यंत हा चित्रपट थिएटर्समध्ये दिसणार की प्रेक्षक त्याकडे पाठ फिरवणार हे येत्या काळातच कळेल. दरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान व देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.