ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जूनला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांकडून यामधील वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची मागणी वारंवार केली जात होती. देशभरातून प्रचंड टीका झाल्यावर चित्रपटातील न आवडलेले तसेच वादग्रस्त संवाद लवकरच काढून टाकले जातील अशी ग्वाही संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी दिली आणि त्यानंतर दोन दिवसांनी ‘आदिपुरुष’मधील काही संवादांमध्ये बदल करण्यात आला. मीडियासमोर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकासह सोशल मीडियावर मनोज मुंतशीर यांनाही ट्रोल केले जात होते. अखेर या सगळ्या वादानंतर २३ दिवसांनी मनोज मुंतशीर यांनी जाहीरपणे आपली चूक मान्य करत सोशल मीडियावर माफी मागितली आहे.
हेही वाचा : 72 Hoorain: पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला चित्रपट, कमावले फक्त ‘इतके’ लाख रुपये
‘आदिपुरुष’ रिलीज झाल्यावर यामधील सर्व कलाकार आणि चित्रपटाच्या टीमला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. चित्रपट प्रदर्शित होऊन आज २३ दिवस झाल्यावर संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी ट्वीट करून प्रभू श्रीरामाचे भक्त, साधू-संत आणि प्रेक्षकवर्गाची जाहीर माफी मागितली आहे.
हेही वाचा : “मी आईला घाबरून होतो”, दत्तू मोरेचा प्रेम विवाहाबद्दल खुलासा; म्हणाला, “स्वातीच्या बाबांची भेट घेतली अन्…”
मनोज मुंतशीर आपल्या लिहितात, “‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे मी समस्त जनतेच्या भावना दुखावल्या आहेत हे मला मान्य आहे. माझे सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ मंडळी, आदरणीय साधू-संत आणि प्रभू श्रीरामाचे भक्त यांची मी हात जोडून क्षमा मागतो. भगवान हनुमानाचे आशीर्वाद सदैव आपल्याबरोबर आहेत. देव आपल्याला पवित्र सनातन आणि आपल्या महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो!” असे ट्वीट करून त्यांनी जनतेची माफी मागितली आहे.
दरम्यान, ‘आदिपुरुष’मधील संवादांमुळे बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या होत्या यामुळेच मध्यंतरी ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने सुद्धा चित्रपटाच्या टीमविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान आणि देवदत्त नागे मुख्य भूमिकेत आहेत.