ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट थिएटर्समध्ये पाहिल्यानंतर सोशल मीडियावर यामधील डायलॉग व व्हीएफएक्सची चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असलेले डायलॉग ऐकून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. रामायणमधील हनुमान अशी भाषा खरंच बोलायचे का? असे प्रश्नही नेटकरी विचारत आहेत.
या संपूर्ण वादावर चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी प्रतिक्रियाही दिली. आत्ताच्या पिढीला हे संवाद कनेक्ट व्हावेत यासाठी ते जाणूनबुजून लिहिण्यात आल्याचं मनोज यांनी स्पष्ट केलं. यानंतर चित्रपटाने पहिल्याच दिवशी १४० कोटींची कमाई केल्याची पोस्ट मनोज यांनी शेअर केली. त्यावरही प्रेक्षकांनी त्यांना खडेबोल सुनावले. आता नुकतंच एका मुलाखतीमध्ये ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणाचे रूपांतर नसल्याचा दावा मनोज मुंतशीर यांनी केला आहे.
आणखी वाचा : दुसऱ्याच दिवशी ‘आदिपुरुष’ला बसणार जबरदस्त फटका; बॉक्स ऑफिसवर कमावणार फक्त ‘इतके’ कोटी
‘आज तक’शी संवाद साधतांना मनोज म्हणाले, “चित्रपटाचे नाव आदिपुरुष आहे. सर्वप्रथम मला २ गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. आम्ही रामायण बनवले नसून आम्ही त्यापासून प्रेरणा घेतली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला येणाऱ्या अस्वीकरणामध्येच आम्ही बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. आम्ही जर ठरवलं असतं तर आम्ही सहज याचं नाव रामायण ठेवलं होतं, पण आम्ही केवळ त्यापासून प्रेरणा घेतलेली आहे. रामायणातील केवळ एका युद्धावर एक छोटीशी कलाकृती आम्ही सादर केली आहे.”
मनोज यांची ओळख राष्ट्रवादी विचारधारेचे लेखक अशी आहे, आणि आता या चित्रपटामुळे त्यांच्याच प्रतिमेला धक्का लागल्याने त्यांचे चाहते नाराज झाले आहेत. चित्रपटातील संवादांमुळे बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास, क्रीती सेनॉन, सैफ अली खान आणि देवदत्त नागे मुख्य भूमिकेत आहेत.