‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि चांगलाच वादात अडकला. चित्रपटातील संवाद, व्हीएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या अभिनयावर नेटकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. अशातच या चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी “हनुमान हा देव नाही, तो रामाचा भक्त आहे. तर त्याला आपण देव बनवलं,” असं खळबळजनक विधान केलं होतं. तर त्या पाठोपाठ आता त्यांनी कर्णाचा उल्लेख करीत एक पोस्ट शेअर केली आहे.
मनोज मुंतशीर यांच्यावर प्रेक्षक सर्वत्र टीका करीत आहेत. या चित्रपटामध्ये हनुमान “तेल तेरे बाप का, कपडा तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की” असं म्हणताना दाखवण्यात आलं आहे. यावरून प्रेक्षक त्यांच्यावर चांगलेच नाराज झाले होते. त्यानंतर या चित्रपटाच्या टीमने संवादांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. पण तरीही त्यांच्यावर होणारी टीका थांबली नाही. त्यांनी हनुमानाबद्दल “तो देव नाही” असं विधान केल्यावर प्रेक्षकांच्या नाराजीत आणखीनच भर पडली. त्यांनी त्यावर स्पष्टीकरणही दिलं. तर आता मनोज मुंतशीर यांना महाभारतातील कर्ण आठवला आहे.
मनोज मुंतशीर यांनी नुकताच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कर्णावर आधारित एका कवितेचा व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ते रामधारी सिंह दिनकर यांच्या रश्मीरथी या कवितेच्या काही ओळी ऐकवताना दिसत आहेत. मनोज मुंतशीर हे या व्हिडीओमध्ये त्या कवितेच्या ज्या ओळी ऐकवताना दिसत आहेत, त्या कर्णाच्या अशा जीवन अध्यायावर भाष्य करतात जेव्हा युद्धादरम्यान त्याच्यासोबत तो विश्वास ठेवू शकेल, अशी एकही व्यक्ती नव्हती.
हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…
तर काही दिवसांपूर्वी मनोज मुंतशीर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत त्यांनी ज्या लोकांना मित्र मानलं त्यांनीच आता त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांचा आणि त्यांच्या आईचा उल्लेख करताना अपशब्द वापरले असे त्यांनी त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्यानंतर आता त्यांनी कर्णावर आधारित ऐकवलेली ही कविता चांगलीच व्हायरल होत आहे. त्यावरही प्रतिक्रिया देत नेटकरी त्यांना ट्रोल करू लागले आहेत.