ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल दोन गट पडल्याचं दिसतंय. प्रभासच्या चाहत्यांनी चित्रपट ब्लॉकब्लस्टर असल्याचं म्हटलंय. पण, दुसरीकडे अनेकांना मात्र विविध कारणांनी हा चित्रपट फारसा आवडला नाही. त्यामुळे ते चित्रपटातील कलाकार व दिग्दर्शकावर टीका करीत आहेत.
एकीकडे या चित्रपटाला जबरदस्त विरोध होत आहे तर दुसरीकडे या चित्रपटाने जगभरात १४० कोटींची रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली आहे. ओम राऊतच्या दिग्दर्शनावर लोकांनी चांगलीच टीका केली आहे. अशातच ओम राऊतचं एक जुनं ट्वीट सध्या प्रचंड चर्चेत आहे. ओम राऊतने हनुमान जयंतीनिमित्त एक ट्वीट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “आम्ही रामायण बनवलंच नाहीये…” ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांचा मोठा दावा
या ट्वीटमध्ये हनुमान जयंतीनिमित्त लावल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरबद्दल ओम राऊतने भाष्य केलं आहे. या ट्वीटमध्ये तो म्हणाला, “भगवान हनुमान बहिरे होते का? माझ्या आसपास राहणाऱ्या लोकांना तरी तसंच वाटतं आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांनी जोरजोरात गाणी लावली आहेत. शिवाय ती गाणी फारच असंबद्ध आहेत.”
ओम राऊतने हे ट्वीट डिलिट जरी केलं असलं तरी नेटकऱ्यांनी त्याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवले आहेत. एका ट्विटर युझरने हे या ट्वीटचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमुळे ओम राऊतला आणखी ट्रोल केलं जात आहे. चित्रपटातून बऱ्याच लोकांच्या श्रद्धास्थानाला धक्का लागला असल्याने प्रेक्षक ओम राऊतवर प्रचंड नाराज आहे. रामायणावर आधारित असलेल्या ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत.