ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. एकीकडे या चित्रपटाला जबरदस्त विरोध होत आहे तर दुसरीकडे या चित्रपटाने जगभरात १४० कोटींची रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली आहे. ओम राऊतच्या दिग्दर्शनावर लोकांनी चांगलीच टीका केली आहे.
‘आदिपुरुष’ याबरोबरच रामायणावर बेतलेल्या आणखी एका चित्रपटाची जबरदस्त चर्चा आहे. पिंकव्हीलाच्या वृत्तानुसार ‘दंगल’ अन् ‘छिछोरे’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनीदेखील ‘रामायणा’वर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. नितेश तिवारी यांच्या या आगामी चित्रपटामध्ये रणबीर कपूर श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. नितेश तिवारी यांच्या या रामायणावर आधारित चित्रपटाला ‘आदिपुरुष दिग्दर्शक ओम राऊतने शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : ‘आदिपुरुष’मध्ये प्रभासला घेण्याबद्दल ओम राऊतचं स्पष्टीकरण; म्हणाला, “त्याचं मन निर्मळ…”
‘इंडिया टूडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओम राऊत म्हणाला, “नितेश हा एक उत्तम दिग्दर्शक अन् माझा चांगला मित्र आहे. मी त्याचा ‘दंगल’ पाहिला आहे. आपल्या देशात बनलेला तो एक सर्वोत्तम चित्रपट आहे. इतर राम भक्तांप्रमाणेही मीदेखील त्यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहे. रामायण किंवा प्रभू श्रीराम यांच्यावर अधिकाधिक चित्रपट येणं हे आपल्यासाठी चांगलंच आहे. हा आपल्या देशाचा अजरामर इतिहास आहे. आपण शक्य होईल तितक्या लोकांपर्यंत हा इतिहास पोहोचवायला हवा.”
अद्याप नितेश तिवारी यांच्याकडून या आगामी चित्रपटाची पुष्टी करण्यात आलेली नाही. ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘आदिपुरुष’ने तीन दिवसांत ३०० कोटींची कमाई केली आहे. ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास, क्रीती सेनॉन, सैफ अली खान अन् देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे.