बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अगदी जवळ आली आहे. अशातच काल या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. आता हा चित्रपट बक्कळ कमाई करणाऱ्या ‘पठाण’ आणि ‘आरआरआर’लाही टक्कर देताना दिसतोय.
‘आदिपुरुष’ हा रामायणावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते. या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तितका चांगला प्रतिसाद या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला मिळायला सुरुवात झाली आहे.
काल या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आणि ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या शोजची तिकीटं मिळवण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपॉलिस यातील बड्या थिएटर्स चेनमध्ये काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जवळजवळ १८ हजार तिकीटं विकली गेली. तर रात्रीपर्यंत ही संख्या २३ ते २५ हजारांच्या आसपास गेली आहे. यापैकी अधिक तिकीटं ही पहिल्या दिवशीच्या शोची आणि थ्रीडी शोची आहेत. त्यामुळे प्रदर्शनाच्या आधी तिकीट विक्रीमध्ये हा चित्रपट ‘पठाण’ आणि ‘आरआरआर’ला जबरदस्त टक्कर देताना दिसत आहे.
दरम्यान, ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केलं आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसेल, अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेची भूमिका साकारणार आहे आणि मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत दिसेल. हा बहुप्रतीक्षित चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.