‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर यातील संवाद, व्हिएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लुकवरून सोशल मीडियावर बरेच वाद निर्माण झाले होते. चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली मात्र, त्यानंतर ‘आदिपुरुष’च्या कलेक्शनमध्ये सातत्याने घट झाली.
‘आदिपुरुष’ चित्रपट देशभरात तसेच सोशल मीडियावर सुरु असलेल्या वादमुळे आधी पायरसी वेबसाइट्स आणि आता युट्यूबवर लीक झाला. माहितीनुसार, चित्रपटाची लिंक शनिवारी युट्यूबवर एचडी क्वालिटीमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. ‘आदिपुरुष’ लीक झाल्यावर या युट्यूबच्या लिंकवर काही तासातच जवळपास २.३ मिलियन (२० लाखांहून अधिक) युजर्सनी हा चित्रपट पाहिला. मात्र, त्यानंतर काही वेळातच ही लिंक बंद करण्यात आली तसेच चित्रपट आता युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे.
चित्रपट लीक होण्यापूर्वी ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांनी शनिवारीच समस्त जनतेची वादग्रस्त संवादांसाठी माफी मागितली होती. “भगवान हनुमानाचे आशीर्वाद सदैव आपल्याबरोबर आहेत. देव आपल्याला पवित्र सनातन आणि आपल्या महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो” असे ट्वीट मुंतशीर यांनी केले होते.
दरम्यान, १६ जूनला प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान आणि देवदत्त नागे मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने सुद्धा चित्रपटाच्या टीमविरुद्ध कारवाईची मागणी केली होती.