ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटावरुन वाद निर्माण झाला होता. रावण व हनुमानाच्या लूक तसेच व्हीएफएक्सवरुनही ‘आदिपुरुष’ला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर रामनवमीच्या दिवशी या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. आता चित्रपटातील हनुमानाचा लूक समोर आला आहे.
हनुमान जयंतीनिमित्ताने चित्रपटातील हनुमानाच्या लूकचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’मध्ये प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील फर्स्ट लूकचं पोस्टर शेअर करत अभिनेत्याने हि माहिती दिली आहे. “श्रीरामाचा भक्त आणि रामकथेचा प्राण…जय पवनपुत्र श्री हनुमान” असं कॅप्शन देवदत्त नागेने या पोस्टला दिलं आहे. देवदत्त नागेने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा>> लग्नानंतर सहा वर्षांनी आई झालेल्या बिपाशाने पहिल्यांदाच शेअर केले लेकीचे गोड फोटो, म्हणाली “देवी…”
देवदत्त नागेने याआधी मराठी मालिक व चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेतून देवदत्त घराघरात पोहोचला. ‘तान्हाजी’ व ‘सत्यमेव जयते’ चित्रपटांतही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. आता ‘आदिपुरुष’ चित्रपटातून देवदत्त प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हेही वाचा>> ऑस्कर विजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्याचे संगीतकार एमएम कीरावनी यांचा पद्मश्रीने गौरव, पाहा व्हिडीओ
दरम्यान, ‘आदिपुरुष’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास श्रीराम तर बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १६ जूनला प्रदर्शित होणार आहे.