बहुचर्चित‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला असला, तरी यामधील काही संवाद आणि दृश्यांबाबत सोशल मीडियावर अजूनही गोंधळ सुरु आहे. अरुण गोविल, मुकेश खन्ना अशा दिग्गज अभिनेत्यांकडून दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रेक्षकवर्गाकडून चित्रपटातील काही संवाद काढून टाकण्याची मागणी वारंवार केली जात होती. यावर चित्रपटातील न आवडलेले संवाद लवकरच काढून टाकले जातील अशी ग्वाही संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी दिली होती. यानुसार आता ‘आदिपुरुष’ चित्रपटातील काही वादग्रस्त संवाद बदलून त्याजागी नव्या संवादांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा : ‘द आर्चीज’चित्रपटाच्या ट्रोलर्सला झोया अख्तरने सुनावले खडेबोल; म्हणाली, “स्टारकिड्सला आधीच नेपोटीजम…”
‘आदिपुरुष’चित्रपटामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वादानंतर निर्मात्यांकडे संवाद बदलण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी अलीकडेच आक्षेपार्ह संवाद बदलले जातील अशी घोषणा केली होती. ‘फिल्मी इन्फोर्मेशन’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ने यापूर्वी १२ जूनला ‘आदिपुरुष’ला U प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर काही संवादांमध्ये बदल करण्यात आला, यास CBFC कडून १९ जूनला मान्यता देण्यात आली. वादग्रस्त जुन्या संवादांमध्ये बदल करून त्याजागी निर्मात्यांनी नवे संवाद जोडले आहेत. हे संवाद कोणते आहेत जाणून घेऊयात…
हेही वाचा : “अजयशी लग्न करणं…” अभिनेत्री काजोलचा लग्नाबाबत मोठा खुलासा, म्हणाली “‘तो’ निर्णय होता सर्वात कठीण”
१. “तू अंदर कैसे घुसा… तू जानता भी है कौन हूं मैं” यामध्ये बदल करून “तुम अंदर कैसे घुसे… तुम जाते भी हो कौन हूँ मैं.” हा नवा डायलॉग जोडण्यात आला आहे.
२. “कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, जलेगी भी तेरे बाप की…” या सर्वाधिक वादग्रस्त संवादाऐवजी चित्रपटात आता “कपडा तेरी लंका का, तेल तेरी लंका का, आग भी तेरी लंका की, जलेगी भी तेरी लंका ही” हा नवा संवाद हनुमानजी इंद्रजीतला उद्देशून बोलतील.
३. “जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे” याऐवजी नवीन डायलॉग “जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका में आग लगा देंगे” असा असेल.
४. “मेरे एक सपोले ने तुम्हारे शेषनाग को लंबा कर दिया अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है” हा संवाद बदलून याच्याऐवजी चित्रपटात “मेरे एक सपोले ने तुम्हारे इस शेषनाग को समाप्त कर दिया अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है” हा नवा संवाद जोडला आहे.
हेही वाचा : राम चरण आणि उपासनाच्या मुलीसाठी हॉस्पिटल परिसरात का केली गुलाबी रंगाची सजावट? कारण वाचून व्हाल थक्क
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणाचे रूपांतर नसल्याचा दावा मनोज मुंतशीर यांनी ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. यानंतर लगेचच त्याच दिवशी त्यांनी प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी आक्षेपार्ह ओळी बदलल्या जातील अशी ग्वाही दिली होती. ‘आदिपुरुष’चित्रपटाने सुरुवातीच्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर आता चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाच दिवसांनंतर, चित्रपटाने जगभरात एकूण ३९५ कोटींचा गल्ला जमवला आहे.