ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट आज(१६ जून) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या आधीच अॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने लाखोंची कमाई केली आहे. बहुचर्चित असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.
‘आदिपुरुष’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ऑनलाइन साइट्सवर लीक झाला आहे. तमिळरॉकर्स, फिल्मीझिला, मुव्हिजरुल्झ आणि इतर पायरसी साइट्सवर ‘आदिपुरुष’ चित्रपट लीक करण्यात आला आहे. हा चित्रपट ऑनलाइन बघण्याबरोबरच डाऊनलोडही करता येणं शक्य आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर याचा थोडा फार परिणाम होणार असल्याने निर्मात्यांची चिंता वाढली आहे.
‘आदिपुरुष’ चित्रपट हा बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल ५०० कोटी खर्च केले आहेत. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातील व्हीएफएक्सवरुन टीका करण्यात आली होती. त्यानंतर व्हीएफएक्सवर अधिक पैसे खर्च करुन त्यात बदल करण्यात आले होते.
रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. प्रभासने या चित्रपटात श्रीराम तर क्रिती सेनॉनने सीता मातेची भूमिका साकारली आहे. सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमान तर अभिनेत्री तेजस्विनी पंडीत श्रृपनखेच्या भूमिकेत आहे.