सोनू निगम हा बॉलिवूडमधील अत्यंत प्रतिभावान गायक आहे. ९० आणि २००० चं दशक सोनूने चांगलंच गाजवलं. त्यानंतर वेगवेगळे नवीन गायक पुढे आले अन् सोनू निगम हा हळूहळू मागे पडला. मग एखाद्या चित्रपटात एखादं गाणंच त्याचं ऐकायला मिळालं. चित्रपटात जरी सोनू फारसा गात नसला तरी तो त्याच्या लाईव्ह शोजमधून त्याच्या चाहत्यांना खुश करत असतो.
आपल्या गाण्याबरोबरच सोनू हा त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. बॉलिवूड नेपोटीजम आणि मनोरंजनसृष्टीतील माफिया याबद्दल मध्यंतरी एक वक्तव्य केल्याने ‘आदिपुरुष’चित्रपटाचे निर्माते आणि भारतातील सर्वात मोठ्या म्युझिक कंपनीचे (टी सीरिज)चे सर्वेसर्वा भूषण कुमार अन् सोनू निगम यांच्यात थोडा तणाव निर्माण झाल्याचं स्पष्ट झालं होतं.
आणखी वाचा : “माझ्या चित्रपटाचे नुकसान…” चित्रपट माफियावर पुन्हा एकदा भडकली कंगना रणौत
आता मात्र त्यांच्यात हा बेबनाव नसल्याचं वृत्त समोर येत आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार ‘लाल सिंह चड्ढा’मधील एका गाण्यासाठी आमिर खानला सोनू निगमच हवा होता. त्यावेळी या चित्रपटाचं म्युझिक टी-सीरिजकडे असल्याने भूषण कुमार आणि सोनू निगम यांनी भेटायचं ठरलं. ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ असं ठरवून या दोघांनी पुन्हा एकत्र काम करायचं ठरवलं. त्यानंतर ‘शेहजादा’ या भूषण कुमार यांच्या चित्रपटासाठीही सोनूने आवाज दिला.
नुकताच आलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटातही सोनूने त्याचा आवाज दिला. याबद्दल जेव्हा सोनू निगमला विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, “या गोष्टीचा जास्त गाजावाजा न केलेलाच बरा. शेवटी शांतता आणि प्रेम या दोन गोष्टी टिकून राहिल्या पाहिजेत.” याच प्रकरणावर मात्र भूषण कुमार यांनी भाष्य करण्याचं टाळलं. सोनूने जेव्हा ‘म्युझिक माफिया’बद्दल एक वक्तव्य केलं होतं तेव्हा सोनू भूषण कुमार यांच्याबद्दल बोलतोय असा गैरसमज झाला होता यामुळे नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या, पण आता सगळं सुरळीत असल्याचं चित्र दिसत आहे.