‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. येत्या १६ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन या चित्रपटामध्ये सीतेच्या भूमिकेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा अंतिम ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये सीताहरणाचे दृश्य दाखवण्यात आले होते. या दृश्याबाबत आता चित्रपटाचे लेखक मनोज मुंतसीर यांनी मोठा खुलासा केला आहे.
हेही वाचा- ‘आदिपुरुष’चे ॲडव्हान्स बुकिंगही हाऊसफुल; एका तिकिटासाठी मोजावे लागतायत तब्बल ‘एवढे’ रुपये
‘आदिपुरुष’च्या ट्रेलरमध्ये रावणाने सीतेला स्पर्श न करता हरण केले असल्याचे दाखवण्यात आले होते. प्रेक्षक या सीनची तुलना रामानंद सागर यांच्या ‘रामायणा’शी करू लागले. अपहरण करताना रावणाने सीतेला का स्पर्श केला नाही, या प्रश्नाचे उत्तर आता निर्मात्यांनी दिले आहे.
‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतसीर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी चित्रपटातील सीताहरण दृश्याबाबत मोठा खुलासा केला आहे. मनोज म्हणाले की, “सीतेच्या आधी रावणाने आपली सून रंभा हिला आपल्या वासनेचा बळी बनवले होते. त्यामुळे रंभाने रावणाला शाप दिला होता की जर त्याने कोणत्याही स्त्रीला तिच्या संमतीशिवाय स्पर्श केलास तर त्याच्या डोक्याचे तुकडे तुकडे होतील. म्हणूनच रावणाने सीतेचे अपहरण करताना तिला स्पर्श केला नाही. रावणाने सीतेला धर्मामुळे नाही तर मृत्यूच्या भीतीने स्पर्श केला नव्हता.”
आतापर्यंत ‘आदिपुरुष’ चित्रपटांच्या लाखो तिकिटांची विक्री झाली आहे. काही चित्रपटगृहांमध्ये ‘आदिपुरुष’च्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’च्या एका तिकिटासाठी प्रेक्षकांना दोन हजार रुपये मोजावे लागणार आहेत. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगही हाऊसफुल्ल झाल्याची माहिती मिळाली आहे.