प्रभास आणि क्रिती सेनॉन यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘आदिपुरुष’ १६ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रेक्षकांबरोबरच या चित्रपटाचे निर्माते आणि कलाकारांनाही या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात प्रभास श्रीरामांच्या, तर क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. रिलीजच्या दोन दिवस आधी चित्रपटाच्या तिकिटाबद्दल मोठी माहिती समोर आली आ’हे.
‘आदिपुरुष’चं ॲडव्हान्स बुकिंग चार दिवसांपूर्वीच सुरू झालं आहे. आतापर्यंत या चित्रपटाची मोठ्या संख्येने तिकीटं प्रेक्षकांना मोफत वाटण्यात आली. तसंच फक्त ॲडव्हान्स बुकिंगमधूनच या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. अशातच या चित्रपटाच्या तिकीटाच्या किंमतीत वाढ करण्यासाठी निर्माते प्रयत्न करू लागले आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्याशी ‘आदिपुरुष’च्या तिकीटांच्या किमतींबाबत एक मीटिंग केली. निर्मात्यांनी जगन मोहन रेड्डी यांना ‘आदिपुरुष’च्या तिकीटांच्या किंमतीत वाढ करण्याची विनंती केली.
आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ची ‘पठाण’ आणि ‘RRR’ला जबरदस्त टक्कर, प्रदर्शनाआधीच विकली गेली ‘इतकी’ तिकीटं
या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आंध्र प्रदेशच्या मुखमंत्र्यांना सिंगल स्क्रीन्स आणि मल्टिप्लेक्समध्ये तिकीटाच्या किंमतीत ५० हून जास्त रुपयांनी वाढ करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार आता या चित्रपटाच्या तिकीटांच्या किंमतीत कमीत कमी ५० रुपयांनी वाढ केली जाईल. यासोबतच निर्मात्यांनी तेलंगणा सरकारला सिंगल स्क्रीनच्या किमती फक्त ५० रुपयांनी वाढवण्याची विनंती केली आहे. मात्र, मल्टिप्लेक्समध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करू नये, असे सांगितले आहे. त्यानंतर निर्मात्यांचे आवाहन ऐकून तेलंगणा सरकारने तिकीट दरात वाढ करण्याची नोटीस बजावली आहे.
सरकारच्या आदेशानंतर, तेलंगणात १६ जूनपासून पुढील तीन दिवसांपर्यंत म्हणजे वीकेंडला ५० रुपये प्रति तिकीट दराने सिंगल स्क्रीनवर तिकिटे विकली जातील. त्याचबरोबर मल्टिप्लेक्स सिनेमाच्या तिकिटाची किंमत २९५ रुपये असेल. त्यामुळे जर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे राहणाऱ्या चाहत्यांना महाग तिकीट खरेदी करायचं नसेल तर त्यांना १६ जूनच्या आधी तिकीट बूक करणं गरजेचं आहे.