आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होताच वादात अडकला आहे. चित्रपटातील संवाद, व्हीएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लूकवरून नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. इतकंच नव्हे तर या चित्रपटाविरोधात हिंदू सेनेच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. चित्रपटावरून पहिल्याच दिवशी वाद सुरू झाला आहे. अशातच चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी हनुमानाबद्दल खळबळजनक विधान करून नवीन वाद निर्माण केला आहे.
‘आदिपुरुष’च्या संवाद आणि दृश्यांवरून बराच गदारोळ झाला होता. विशेषत: हनुमानाच्या व्यक्तिरेखेसाठी लिहिलेल्या संवादांवरून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. चित्रपटात हनुमानाच्या तोंडी “तेल तेरे बाप का, कपडा तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की” असे म्हणताना दाखवण्यात आले आहे. या संवादांवर स्वत:चा बचाव करताना मनोज मुंतशीर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिले होते. मात्र, आता मनोज यांच्या नव्या दाव्यामुळे वेगळा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- “हे संवाद माझे नाहीत…” ‘आदिपुरुष’मधील “तेल तेरे बाप का..” या संवादावर मनोज मुंतशीर यांचं स्पष्टीकरण
मनोज मुंतशीर म्हणाले, “सोप्या भाषेत लिहिण्यामागील आमचे एक ध्येय होते ते म्हणजे बजरंगबली, ज्याला आपण शक्ती, बुद्धिमत्ता आणि विद्येची देवता मानतो. ज्या बजरंगबलीकडे डोंगरासारखे बळ आहे, ज्याचा वेग शेकडो घोड्यांचा आहे, तोच बजरंगबली लहान मुलासारखा आहे. त्याचा बालसुलभ स्वभाव असा आहे की तो हसतो, तो श्रीरामांसारखा बोलत नाही, तो तात्त्विक बोलत नाही, बजरंगबली हा देव नाही, तो भक्त आहे, त्याच्या भक्तीत शक्ती होती म्हणून आपण त्याला नंतर देव बनवले.” मनोज मुंतशीरची ही मुलाखत पाहून लोक आणखी संतप्त झाले आहेत. अनेकांनी त्यांना यापुढे मुलाखत न देण्याचा सल्ला दिला आहे.
आदिपुरुष’ १६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. नेपाळने हा चित्रपटच नाही तर इतर हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावरही बंदी घातली आहे. वाढता वाद पाहता चित्रपट आणि टी-सीरिजच्या निर्मात्यांनी नेपाळच्या महापौरांना पत्र लिहून माफी मागितली आहे. ‘आदिपुरुष’मध्ये प्रभासने रामाची, कृती सेननने सीतेची आणि देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे. तर सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे.