‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचे कलाकार व दिग्दर्शक यांच्यावर जेवढी टीका झाली तेवढीच किंबहुना त्याहून कित्येक पटीने जास्त टीका याचे लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर झाली. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांना जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा मिळाल्या. त्यानंतर मनोज यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली. आता याच वादामुळे मनोज मुंतशीर पुन्हा चर्चेत आले आहेत.
मनोज यांनी ‘आज तक’शी संवाद साधताना या विषयावर भाष्य केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात इतकी नकारात्मकता पसरली होती की, ते ब्रेक घेऊन परदेश दौऱ्यावर गेले होते. याबरोबरच आता या मुद्द्यावर त्यांनी आपली चूक मान्य करत चित्रपटाची कथा लिहिण्यात मोठी चूक झाल्याचेही मनोज यांनी कबूल केले. मनोज म्हणाले, “मी माझ्या चुकीच्या लिखाणावर पडदा टाकायचा प्रयत्न कधीच करणार नाही. शंभर टक्के माझ्याकडून चूक झाली आहे.” याबरोबरच ही चूक जाणूनबुजून केली नसल्याचंही त्यांनी मान्य केलं.
या घटनेतून मनोज यांना चांगलाच धडा मिळाला असल्याचंही त्यांनी मान्य केलं. मनोज म्हणाले, “धार्मिक भावना दुखवण्याचा, सनातन धर्माचा अपमान करण्याचा, प्रभू श्रीराम व हनुमान यांच्या प्रतिमा मलिन करायचा माझा अजिबात हेतू नव्हता.” या चित्रपटामुळे जो वाद निर्माण झाला त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबियांवरही झाल्याचं मनोज यांनी स्पष्ट केलं. पुढे ‘बाहुबली’ चित्रपटाचा उल्लेखही त्यांनी केला.
त्याबद्दल मनोज म्हणाले, “याआधी मी ‘बाहुबली’सारखा चित्रपटही लिहिला आहे, ‘तेरी मिट्टी’, ‘देश मेरे’सारखी गाणीही लिहिली आहेत. आज देशात रामनवमी असो किंवा दिवाळी त्यादिवशी माझ्या गाण्यांशिवाय सण साजरे होत नाहीत ही माझ्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. एक चूक माझ्या हातून घडली आहे, तर तुम्ही माझ्या हातून माझी लेखणी काढून घेणार आहात का? दुसरी संधी प्रत्येकालाच मिळायला हवी.” यादरम्यान मनोज यांनी ‘आदिपुरुष’मुळे निर्माण झालेल्या वादाचा आपल्या कुटुंबियांवरही परिणाम झाल्याचं स्पष्ट केलं.