डॉक्टर ते मॉडेल अन् अभिनेत्री असा प्रवास करणारी अदिती गोवित्रीकर हीची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द फारशी मोठी नाही. तरी ती स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली. मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्याने अदितीसाठी चित्रपटसृष्टीतील हा प्रवास सोपा नव्हता. कास्टिंग काउचचे काही अनुभव अन् यश चोप्रा यांच्याबरोबर काम करायची संधी कशी हुकली याबद्दल नुकतंच अदितीने भाष्य केलं आहे.
‘बॉलिवूड ठिकाना’शी संवाद साधताना अदितीने तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकला. याबरोबरच यश चोप्रा यांच्या ऑफरला नकार दिल्याचा पश्चात्ताप होत असल्याचंही तिने या मुलाखतीमध्ये कबूल केलं. तिने असा नकार का दिला यामागील कारणही स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा : लाल साडीतील अनन्या पांडेचा हॉट अवतार चर्चेत; चाहत्याने कॉमेंट करत लिहिले, “तू चीज बडी…”
अदिती म्हणाली, “यश चोप्रा यांनी मला एका मीटिंगसाठी बोलावलं होतं, पण चित्रपटक्षेत्राबद्दल फारशी काही माहिती नसल्याने मी थोडी घाबरले होते, याबरोबरच मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्याने माझ्या डोक्यात बरेच विचार यायचे, त्यामुळे त्यांना भेटायला जायचं मी धाडस करूच शकले नाही. ही माझ्या आयुष्यातील खूप मोठी चूक होती याची जाणीव मला आता होत आहे, तो केवळ मूर्खपणा होता.”
यामागील कारण सांगताना अदिती म्हणाली, “मला याआधी आलेले कास्टिंग काउचहे काही अनुभव यासाठी कारणीभूत ठरले, त्यामुळेच मनात एक भीती बसली होती. हे सगळं हाताळाचं कसं ते मला माहीत नव्हतं. प्रत्येकवेळी माझी आई माझ्याबरोबर येईलच असं होणार नाही. त्यामुळे तेव्हा माझ्याबरोबर कुणीच नव्हतं. पण नंतर मात्र मी या सगळ्याचा फार विचार करायचा नाही असं ठरवलं.”
यानंतर अदितीला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी अधिक सुरक्षित वाटू लागली. तिथली काम करण्याची पद्धत अन् एकूणच परिस्थिती पाहता तिने तिथेच कारीअर करायचे ठरवले अन् १९९९ मध्ये पवन कल्याण यांच्याबरोबर चित्रपटात पदार्पण केले.