अभिनेत्री अदिती राव हैदरीने दुसरं लग्न केल्याची चर्चा सुरू असतानाचं अदितीने मौन सोडत या अफवेला पूर्णविराम दिला. अदिती व सिद्धार्थ यांनी लग्न नाही, तर साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा आणि दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थबरोबरचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली.
अदिती व सिद्धार्थ यांनी २७ मार्च रोजी तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम इथं साखरपुडा केला. ‘तो हो म्हणाला’ असं कॅप्शन देत अदितीने साखरपुड्याची गुडन्यूज दिली. दोघांनी लग्न केल्याचं वृत्त तेलुगू माध्यमांनी दिलं होतं. पण अदिती व सिद्धार्थ यांनी साखरपुडा केला आहे हे आता अदितीनंच स्पष्ट केलंय. अदिती लवकरच दुसर्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. यानिमित्ताने अदितीचा पहिला पतीबद्दल जाणून घेऊया.
आदितीचं सत्यदीप मिश्राबरोबर लग्न झाल्याची बातमी समोर आली होती. तथापि, तिने कधीही तिच्या वैवाहिक स्थितीबद्दल भाष्य केलं नाही. २०१३ मध्ये तिने खुलासा केला होता की ते दोघं वेगळे झाले आहेत. सत्यदीपने नंतर ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ताबरोबर लग्न केलं. मसाबा गुप्ता एक सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे. २०२३ रोजी मसाबा आणि सत्यदीप यांनी लग्नगाठ बांधली. मसाबाचं पहिलं लग्न निर्माते मधु मंतेना यांच्याशी झालं होतं. २०१५ मध्ये त्यांचं लग्न झालं आणि २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
अदितीचा होणारा पती सिद्धार्थ याचंही हे दुसरं लग्न आसणार आहे. २००३ मध्ये सिद्धार्थच्या बालपणीची प्रेयसी मेघनाबरोबर त्याने लग्न केलं होतं. मात्र, २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
दरम्यान, अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं तर, २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘महासमुद्रम’ चित्रपटात दोघांनी एकत्रित काम केलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेकदा ते कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावताना दिसले. चंदिगडमध्ये पार पडलेल्या बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नालाही त्यांनी एकत्र हजेरी लावली होती.