अभिनेत्री अदिती राव हैदरी दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अदितीचा पूर्वाश्रमीचा पती सत्यदीप मिश्राने फॅशन डिझायनर व अभिनेत्री असलेल्या मसाबा गुप्ताशी जानेवारी महिन्यात लग्न केलं. त्यानंतर आता अदिती राव हैदरीच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ती सिद्धार्थबरोबर अनेकदा वेळ घालवताना दिसते. अलीकडेच तिने सिद्धार्थबरोबरचा डान्स रील शेअर केला होता.
सिद्धार्थ व अदिती राव हैदरी या दोघांनी एका चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर ते दोघं बऱ्याचदा एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसतात. सत्यदीपने लग्न केल्यानंतर आता अदिती व सिद्धार्थ दोघेही लग्न करतील, असं म्हटलं जात आहे. सातत्याने तिच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा होत आहे. या सर्व चर्चांवर अदितीने मौन सोडलं आहे.
अदिती म्हणाली की तिला नात्याबद्दल सुरू असलेल्या अफवांकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही. “मी काम करत असल्याने मी त्याकडे पाहत बसत नाही. लोक काहीतरी बोलतील आणि आपण त्यांना बोलण्यापासून रोखू शकत नाही. त्यांना जे मनोरंजक वाटतं, ते तेच करणार. मला जे इंटरेस्टिंग वाटतं, ते मी करेल आणि मला वाटतं की ते ठीक आहे. जोपर्यंत मला माझ्या आवडत्या दिग्दर्शकांबरोबर मला आवडतं काम करायला मिळत, तोपर्यंत लोक मला स्वीकारतील आणि मला पाहतील तोपर्यंत मी खरोखर आनंदी आहे,” असं अदिती म्हणाली.
या अफवांवर स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नसल्याचं आदिती म्हणते. या चर्चांवर स्पष्टीकरण देत बसण्याऐवजी ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करेल, असं ती म्हणाली. “अटेंशन देण्यासारखी काही गोष्ट मला वाटत असेल तर ते माझा चित्रपट किंवा शो आहे, कारण त्यात मी स्क्रीनवर दिसणार आहे. मी ज्या दिग्दर्शकांबरोबर काम करते, त्यांच्यासाठी मी माझं काम झोकून देऊन करते, कारण तिथेच मला लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे,” असं अदिती राव हैदरी म्हणाली.
अदिती सध्या ‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. यामध्ये तिच्यासह नसीरुद्दीन शाहा देखील मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरिज झी 5 वर प्रदर्शित झाली.