‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरचा बहुचर्चित आगामी चित्रपट ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’च्या समोरील अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाही आहेत. गेल्या काही वर्षांपासून या चित्रपटाशी निगडीत वाईट गोष्टीच समोर येत आहेत. आधी यामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत होता, त्याने यासाठी तयारीदेखील केली होती, पण काही दिवसांपूर्वीच विकी कौशलने या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतल्याची बातमी समोर आली.
नंतर विकी कौशलऐवजी रणवीर सिंग यात मुख्य भूमिकेत दिसणार अशी चर्चा रंगली होती, पण नुकतंच रणवीर त्या चित्रपटात काम करणार नसल्याची बातमी समोर आली. मध्यंतरी या चित्रपटातून अभिनेत्री सारा अली खानलासुद्धा बाहेरचा रस्ता दाखवला होता. अशातच या चित्रपटाशी निगडीत आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे.
आणखी वाचा : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेखर सुमनने दिली बायकोला आलीशान गाडी; किंमत ऐकून व्हाल थक्क
‘पिंकव्हीला’च्या वृत्तानुसार या चित्रपटाच्या मेकर्सना प्रदर्शनाआधीच तब्बल ३० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. सर्वप्रथम रॉनी स्क्रूवाला हे याची निर्मिती करणार होते, नंतर काही कारणास्तव त्यांनी यातून काढता पाय घेतला. नंतर आदित्य धर यासाठी निर्माता शोधत होता. नंतर जिओ स्टुडिओने याची निर्मिती करायचं ठरवलं, पण विकी कौशलला न घेता हा चित्रपट करावा असं त्यांचं मत होतं.
आणखी वाचा : “आता खुपणार नाही तर…” अवधूत गुप्तेचा लोकप्रिय कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ लवकरच होणार सुरू
यानंतर आदित्यने बऱ्याच मोठमोठ्या कलाकारांना यासाठी विचारलं, पण आता जिओनेही या चित्रपटाच्या निर्मितीला नकार दिल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या ३ वर्षांपासून या चित्रपटावर आदित्य धर आणि त्याची टीम काम करत आहेत, यादरम्यान तब्बल ३० कोटी खर्च झाल्याचं स्पष्ट झालं आहे आणि आता निर्माता नसल्याने हे नुकसान वाढलं असल्याचं म्हंटलं जात आहे. एकूणच या चित्रपटाचं भविष्य अंधकारमय असल्याचीच चर्चा सध्या होत आहे.