नव्वदच्या दशकामध्ये शाहरुख खानची खूप क्रेझ होती. तेव्हा एका वर्षाला त्याचे चार ते पाच चित्रपट प्रदर्शित व्हायचे. १९९५ मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या सुपरहिट चित्रपटाने तो ग्लोबल स्टार बनला होता. या चित्रपटामुळे त्याच्याकडे खूप सारे निर्माते चित्रपटांच्या ऑफर्स घेऊन यायचे. ‘परदेस’च्या निमित्ताने सुभाष घई आणि शाहरुख पहिल्यांदा एकत्र काम करत होते. या चित्रपटाच्या नायिकेसाठी महिमा चौधरीची निवड करण्यात आली होती. गायक आदित्य नारायणने या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते.
आज शाहरुखचा ५७ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने आदित्यने या ‘परदेस’च्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगताना शाहरुखचे कौतुक केले. न्यूज18.कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, “तेव्हा शाहरुख भाई सुपरस्टार बनला होता. ‘बाजीगर’, ‘डर’, ‘करन अर्जुन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ असे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले होते. १९९७ मध्ये ‘परदेस’सह ‘येस बॉस’ आणि ‘दिल तो पागल है’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यावेळी तो प्रसिद्धीच्या शिखरावर होता. असे असूनही सेटवर असलेल्या सर्वांनी तो खूप नम्रपणे वागायचा.”
तो पुढे म्हणाला, “त्यावेळी तो ‘परदेस’सह अजून एक चित्रपट करत होता. काही वेळेस त्याची व्हॅनिस व्हॅन यायला उशीर व्हायचा. अशा वेळी तो एका कोपऱ्यात बॅग ठेवायचा, बाजूला चादरसारखा कपडा अंथरायचा आणि त्यावर झोपून जायचा. कामाप्रती त्याची निष्ठा कौतुकास्पद होती. तक्रार, रागराग न करता तो कामावर लक्ष द्यायचा. त्याच्यामध्ये कोणताही अहंकार नव्हता. ‘परदेस’च्या सेटवर जेव्हा काम संपायचे, तेव्हा आम्ही सर्वजण मिळून किक्रेट आणि फुटबॉल खेळायचो.”
आणखी वाचा – अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटात झळकणार ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री!
‘ब्रह्मास्त्र: भाग १ शिवा’ या चित्रपटामध्ये शाहरुख खानने छोटीशी भूमिका केली होती. त्याच्या या भूमिकेचे फार कौतुक झाले होते. या वर्षांमध्ये त्याने ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’, ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ अशा तीन चित्रपटांमध्ये कॅमिओ केला आहे. पुढच्या वर्षी त्याचे ‘पठाण’, ‘जवान’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.