बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी सायबर फ्रॉडचा बळी ठरला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार एका मेसेजमुळे त्याच्या बँक खात्यातून १.५० लाख रुपये लंपास करण्यात आले. अभिनेत्याने सांगितले की त्याला खाजगी बँकेचे केवायसी (KYC) अपडेट करण्यासाठी मेसेज आला होता. याचदरम्यान त्याच्या खात्यातून पैसे काढले गेले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आफताबला एका अनोळखी नंबरवरुन मेसेज आला. त्या मेसेजमध्ये त्याला त्याच्या बँक खात्यासाठी केवायसी अपडेट करण्यासाठी सांगितलं होतं व ते अपडेट न केल्यास त्याचे अकाऊंट सस्पेंड होईल असंही त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं.
आफताबने मेसेजमधील लिंकवर क्लिक केलं आणि पुढील प्रोसेसप्रमाणे तो केवायसी अपडेट करू लागला. त्यानंतर त्याला आणखी एक मेसेज आला ज्यात त्याच्या खात्यातून १,४९,९९९ रुपये काढल्याचं समोर आलं. यानंतर ९ ऑक्टोबरला आफताबने बँकेच्या ब्रांच मॅनेजरशी संपर्क साधला तेव्हा त्याने या प्रकरणात सायबर पोलिसांची मदत घेण्याचा सल्ला बँकेने त्याला दिला.
आफताबने लगेच पोलिसांत तक्रार नोंदवली. भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ४२० (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. यापूर्वी जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ यांनी ५८ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. एवढेच नाही तर अन्नू कपूर यांचीही केवायसी अपडेटच्या नावाखाली ४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.