बॉलिवूडमध्ये सुरू झालेला रिमेकचा ट्रेंड हा आणखीनच जोर धरू लागला आहे. येणाऱ्या काही दिवसांत आणखीन काही रिमेक आपल्यासमोर येणार आहेत तर काही चित्रपटांच्या रिमेकसंदर्भात माहिती समोर आलेली आहे. अशातच ‘कैथी’ आणि ‘दृश्यम’सारख्या चित्रपटांच्या यशस्वी रिमेकनंतर अजय देवगणने आता नव्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुजराती चित्रपट ‘वश’ चित्रपटाने चांगला व्यवसाय केला.
आता ही कथा हिंदीत आणण्याची जबाबदारी अजय देवगणने घेतली आहे. विशेष म्हणजे यात अजय देवगणसह दाक्षिणात्य अभिनेता आर माधवनही दिसणार आहे. ‘सुपर ३०’ आणि ‘क्वीन’ सारखे चित्रपट दिग्दर्शित करणारे विकास बहल हे या गुजराती चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहे. या रिमेकमध्ये अजय देवगण आणि आर माधवन हे दोन स्टार्स प्रथमच एकत्र काम करणार आहेत.
आणखी वाचा : इलियाना डिक्रूझचे बेबी बंप दाखवतानाचे फोटो व्हायरल; नेटकऱ्यांनी “लग्न झालंय का?” म्हणत पुन्हा केलं ट्रोल
इतर कलाकारांबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनीदेखील याविषयी ट्वीट करत माहिती दिली आहे. अजय देवगण जूनमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हैसूर, लंडन ते मुंबईपर्यंत याचे चित्रीकरण होणार आहे. अजय देवगण, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अजय देवगणचा काही काळापूर्वी बॉक्स ऑफिसवर ‘भोला’ चित्रपट होता, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. त्यापूर्वी अजयचा ‘दृश्यम २’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. याबरोबरच अजय देवगण लवकरच ‘मैदान’ या चित्रपटात दिसणार आहे जो जून २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. शिवाय अजय ‘चाणक्य’ आणि ‘रेड २’ सारख्या चित्रपटावरही लवकरच काम सुरू करणार आहे.