काल ऑस्टेलियामध्ये सुरु असलेल्या आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेतला भारत विरुद्ध इंग्लंड हा उपांत्य फेरीतला शेवटचा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकत इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या काही षटकांमध्ये केएल राहुल, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव बाद झाले. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी मिळून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघाने वीस षटकांमध्ये १६८ धावा केल्या. पुढे इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी शानदार कामगिरी करत भारताचा १० गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीमध्ये स्थान निश्चित केले.
टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले. काहीजण या पराभवासाठी अमुक खेळाडू कारणीभूत आहे असे म्हणत त्याला ट्रोल करायला लागले. याच सुमारास अनेक मान्यवरांसह बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या. अभिनेता अजय देवगण क्रिकेटचा मोठा चाहता आहे. त्यानेही यासंबंधित पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
“प्रिय टीम इंडिया,
देशावासियांची स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. या प्रयत्नांना हातभार म्हणून तुमच्या नावाचा जयघोष करताना आम्हाला नेहमीच आनंद होत असतो. हा अनुभव आमच्यासाठी खूप मौल्यवान असतो. तुम्ही उपांत्य फेरीमधून बाहेर पडला असलात, तरी या स्पर्धेमधील तुमच्या प्रवासाचा आनंद आम्ही घेतला. संपूर्ण राष्ट्राच्या अपेक्षांचं ओझं बाळगून इतक्या मोठ्या स्तरावर खेळताना तुमच्यावर किती ताण येत असेल याचा आम्ही विचार सुद्धा करु शकत नाही.
जयपराजय हा खेळाचा भाग आहे. ते टाळणे अशक्य आहे. या क्षणी आम्ही तुमच्याबरोबर आहोत. या कठीण काळामध्ये आम्ही जगातल्या सर्वोत्तम संघाला पाठिंबा देण्यासाठी उभे आहोत. काळजी करु नका मित्रांनो. आपण पुन्हा एकदा नव्या जोमाने कमबॅक करु.
तुमचा चाहता, अजय देवगण”, असे त्याच्या या पोस्टमध्ये लिहिलेले आहे.
या पोस्टमध्ये खालच्या बाजूला भारतीय संघाचा फोटो लावलेला आहे आणि या माध्यमातून मनातील भावना व्यक्त करत त्याने भारतीय संघाची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. अजय देवगणसह आणखीही अनेक सिनेकलाकारांनी भारतीय क्रिकेटपटूंची बाजू घेतली आहे.