Sunil Dutt broken after Nargis Death: ‘हुमायून’, ‘मदर इंडिया’, ‘आवारा’, अशा अनेक चित्रपटांसाठी दिवगंत अभिनेत्री नर्गिस ओळखल्या जातात. बॉलीवूडमधील त्यांचे योगदान मोठे आहे. या दिग्गज अभिनेत्रीचे १९८१ ला कर्करोगामुळे ५१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
नर्गिस यांच्या निधनानंतर सुनिल दत्त हे पूर्णपणे कोसळले होते. पत्नीच्या निधनानंतर दु:खात बु़डाले होते. त्यांनी स्वत:ची काळजी घेणे बंद केले. मुलांकडे दुर्लक्ष केले. पण एकेदिवशी त्यांच्या लक्षात आले की मुलांना त्यांची गरज आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:चे आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याचा निर्णय घेतला. नर्गिस व सुनिल दत्त यांची मुलगी प्रिया दत्त यांनी नुकत्याच एका मुलाखतीत याबाबत वक्तव्य केले.
“आम्हाला त्यांची भीती वाटायची”
प्रिया दत्त यांनी नुकतीच विकी लालवाणीच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रिया दत्त म्हणाल्या, “आईचे उपचार अमेरिकेत चालू होते. तेव्हा तिला नरकयातना भोगाव्या लागल्या. ज्यावेळी तिला वाटले की तिचा शेवट जवळ आला आहे, त्यानंतर तिने भारत परतण्यासाठी आग्रह केला. आईच्या मृत्यूनंतर आमचे आयुष्य खूप बदलले. माझे वडील दु:खात बुडाले. आम्हाला त्यांची भीती वाटायची. ते मध्यरात्री उठायचे. ३-४ वाजता कबरीस्तानमध्ये जायचे आणि तिथे बसून राहायचे. त्यांना रात्री झोप येत नसे. कामावर ते लक्ष केंद्रित करू शकत नसत.”
प्रिया दत्त पुढे म्हणाल्या, मी वडिलांबरोबर एकदा रात्री बसले होते. त्यांना आकाशातला एक तारा दाखवला व त्यांना सांगितले की आई आपल्यावर लक्ष आहे. तसेच आपल्याला इजा होऊ नये म्हणून ती आपले संरक्षण करत आहे. माझ्या या बोलण्याचा त्यांच्यावर खूप मोठा परिणाम झाला. एका रात्रीत ते बदलले. त्यांच्यात खूप मोठा बदल झाला. त्यांनी सगळ्या सिगारेटी, दारूच्या बाटल्या बाहेर फेकल्या. त्यांनी दारू प्यायला सुरुवात केली होती, मात्र एका रात्रीत त्यांनी सगळे बाहेर फेकले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांवर म्हणजेच आमच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
“याच काळात संजय दत्त ड्रग्जच्या व्यसनात अडकला होता. त्याच्या या व्यसनामुळे कुटुंबाला आणखी काही वर्षे त्रास सहन करावा लागला. त्याला त्याच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी काही वर्षाचा काळ जावा लागला. यातून बाहेर पडण्यासाठी संजय दत्तला नर्गिस यांच्या व्हाइस रेकॉर्डिंग केलेल्या मेसेजची मदत झाली. नर्गिस यांनी कर्करोगाच्या उपचारादरम्यान संजय दत्तसाठी काही मेसेज रेकॉर्ड केले होते”, असाही खुलासा प्रिया दत्त यांनी केला.