बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने ४ वर्षांनी ‘पठाण’ या चित्रपटातून पदार्पण केलं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने इतिहास रचला. भारतात ५०० कोटी तर जगभरात ९०० कोटीहून अधिक कमाई या चित्रपटाने केली. शाहरुखच्या चाहत्यांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला. याबरोबरच हा चित्रपट एवढा सुपरहीट होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे सलमान आणि शाहरुख या दोन सुपरस्टार्सचं एका चित्रपटात दिसणं. ‘पठाण’मधील सलमान खानचा कॅमिओ चांगलाच गाजला. खूप वर्षांनी प्रेक्षकांनी त्यांचे २ लाडके सुपरस्टार्स मोठ्या पडद्यावर एकत्र अॅक्शन करताना पाहिले.
आता पुन्हा या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. लवकरच चाहत्यांची ही इच्छाही पूर्ण होणार आहे. ‘टायगर ३’ या सलमानच्या आगामी चित्रपटात सलमान आणि शाहरुख यांचा एक असाच धमाल सीन बघायला मिळणार आहे. लवकरच हा सीन चित्रित करण्यात येणार असून यासाठी वेगळा खास सेट तयार करण्यात येणार आहे.
आणखी वाचा : मुंबई पोलिसांनी दर्शवून दिली बॉलिवूडच्या ‘शहजादा’ची ‘ही’ चूक; कार्तिक आर्यनसाठीची खास पोस्ट व्हायरल
मीडिया रीपोर्टनुसार सलमान आणि शाहरुखमधला हा खास सीन येत्या एप्रिल महिन्यात चित्रित केला जाणार असल्याचं म्हंटलं जात आहे. यासाठी एक खास मोठा सेटही तयार करण्यात आला आहे. यश राज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा हे दोघेही भाग आहेत. ‘पठाण’मध्ये टायगरची धमाकेदार एन्ट्री पाहून आता लोकांना ‘टायगर ३’मध्ये ‘पठाण’ला पाहण्याची उत्सुकता आहे. या दोघांमधील हा सीन खरंतर गेल्यावर्षीच चित्रित होणार होता, पण काही कारणास्तव त्याला आणखी उशीर झाला.
सलमान खानच्या या ‘टायगर ३’मध्ये इम्रान हाश्मी हा नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळणार आहे, शिवाय सोबतीला कतरिना कैफसुद्धा दिसणार आहे. यापेक्षा चाहत्यांना खरी उत्सुकता ‘पठाण’ आणि ‘टायगर’च्या भेटीची आहे. शाहरुख खान आता ‘पठाण’नंतर त्याच्या ‘जवान’ आणि ‘डंकी’ या दोन चित्रपटावर काम करत आहे. मीडिया रीपोर्टनुसार शाहरुखच्या ‘जवान’ची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, तर सलमान खानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट १० नोव्हेंबर २०२३ यादिवशी प्रदर्शित होणार आहे.