Akshay Kumar donation for Haji Ali Dargah: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने नुकतीच मुंबईतील हाजी अली दर्ग्यावर चादर चढवली आणि दर्ग्याच्या नूतनीकरणासाठी १.२१ कोटी रुपयांची देणगीही दिली. हाजी अली दर्गा ट्रस्ट व माहीम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांनी त्यांच्या एक्स हँडलवर ही माहिती दिली. त्यांनी दर्ग्याजवळ अक्षय कुमारचे स्वागत केले.
अभिनेता अक्षय कुमारने मुंबईतील हाजी अली दर्ग्याला कोट्यवधींची देणगी दिली आहे. अक्षयने गुरुवारी सकाळी (८ ऑगस्ट रोजी) दिग्दर्शक मुदस्सर अझीझबरोबर मुंबईतील हाजी अली दर्ग्याला भेट दिली. यावेळी त्याने दर्ग्याच्या नूतनीकरणासाठी १.२१ कोटी रुपये दान केले. यापूर्वी त्याने उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथील राम मंदिर बांधकामासाठी तीन कोटी रुपयांची देणगी दिली होती.
हाजी अली दर्गा ट्रस्टच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून अक्षय कुमारने (Akshay Kumar Video) दर्ग्याला दिलेल्या भेटीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तसेच त्याने दिलेल्या देणगीबद्दल आभार माले आहेत. यावेळी दर्ग्यातील विश्वस्तांनी अक्षय कुमारचे दिवंगत पालक, आई अरुणा भाटिया व वडील हरी ओम भाटिया यांच्यासाठी प्रार्थना देखील केली.
पाहा व्हिडीओ –
अक्षय कुमारचे हाजी अली दर्ग्यात जातानाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापूर्वी अक्षयने मुंबईत गरजू लोकांसाठी जेवणाची सोय केली होती. त्याने मुंबईत त्याच्या घराबाहेर लोकांना अन्नदान केलं होतं.
अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास यावर्षी त्याचा तिसरा चित्रपट ‘खेल खेल में’ रिलीज होणार आहे. त्याचे यापूर्वी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘सरफिरा’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणाऱ्या ‘खेल खेल में’ या चित्रपटात वाणी कपूर, तापसी पन्नू, एमी विर्क व फरदीन खान यांसारखे कलाकार आहेत. ‘खेल खेल में’ १५ ऑगस्टला प्रदर्शित होतोय, याच दिवशी बॉक्स ऑफिसवर श्रद्धा कपूर- राजकुमार रावचा ‘स्त्री २’ व जॉन अब्राहम- शर्वरी वाघचा ‘वेदा’ देखील रिलीज होत आहेत.