Kajol Deepfake Video: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोकांचं जीवन अधिक सुकर झालं असलं तरी यामुळे बऱ्याच प्रमाणात धोकादेखील निर्माण झाला आहे. खासकरून सेलिब्रिटीजसाठी हा खूप मोठा धोका आहे. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या ‘डिपफेक व्हिडीओ’ने चांगलीच खळबळ उडवली होती. मूळ व्हिडिओमध्ये ब्रिटिश भारतीय मुलगी ‘झारा पटेल’ होती, परंतु तिच्या मूळ चेहऱ्याऐवजी रश्मिका मंदानाचा चेहरा मॉर्फ करून लावण्यात आला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.
बऱ्याच क्षेत्रातील लोकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आणि या एकूणच विकृत मानसिकतेविरुद्ध निषेधही नोंदवला. खुद्द बिग बी यांनीदेखील ट्वीट करत यासंदर्भात कडक कारवाई करायचीही मागणी केली. अजून हे प्रकरण शांत झालेलं नसताना आणखी एका बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा कपडे बदलण्याच्या व्हिडीओ क्लिपची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
आणखी वाचा : रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणी १९ वर्षांच्या तरुणाची चौकशी; पोलीस म्हणाले, “त्याने तो व्हिडीओ…”
बॉलिवूडवर एकेकाळी राज्य करणारी सगळ्यांची लाडकी काजोल यावेळी या डिपफेक व्हिडीओला बळी पडल्याचं समोर येत आहे. रश्मिकानंतर आता काजोलचा हा बनावट व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे ज्यात काजोल आपल्याला कपडे बदलताना दिसत आहे. ‘बूम’ या फॅक्ट चेकिंग प्लॅटफॉर्मने दिलेल्या रीपोर्टनुसार काजोलचा हा व्हिडीओ बनावट आहे. एका सोशल मीडिया क्रिएटरच्या ऐवजी काजोलचा चेहेरा तिथे लावण्यात आला असून तो व्हिडीओ व्हायरल केला जात आहे.
हा मूळ व्हिडीओ याआधीच ‘टीकटॉक’ या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याने याची शहानिशा करणं सोप्पं झालं असल्याचं काहींचं म्हणणं आहे. अद्याप या मूळ व्हिडीओतील सोशल मीडिया क्रिएटरची ओळख समोर आलेली नसली तरी ‘क्विंट’ने दिलेल्या वृत्तानुसार हा मूळ व्हिडीओ रोजी ब्रीन या सोशल मीडिया क्रिएटरचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रश्मिका मंदानाच्या व्हिडीओप्रकरणी नुकतंच दिल्ली पोलिसांनी बिहारमधून १९ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. लवकरच या प्रकरणावरही त्वरित कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. केवळ रश्मिका आणि काजोलच नव्हे तर सारा तेंडुलकर, शुभमन गील, कतरिना कैफ यांचेदेखील फोटोज आणि व्हिडीओज मध्यंतरी व्हायरल झाले होते.