बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला जीवे मारण्याची धमकी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने दिली होती. त्यानंतर रोहित गर्ग नावाच्या एका तरूणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई मेल पाठवून अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकीचा मेल आल्यानंतर मुंबई पोलिसांकडून सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
सलमानचे कुटुंबीयच नव्हे तर त्याच्या चाहत्यांवरही पोलिसांनी बंधनं घातल्याचं स्पष्ट झालं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार काही इंस्पेक्टर आणि ८ ते १० कॉंस्टेबल हे सलमानच्या सुरक्षेसाठी त्याच्या घराबाहेर तैनात करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय या रीपोर्टनुसार सलमानच्या मुंबईच्या घराखाली त्याच्या चाहत्यांना फिरकण्यास किंवा जमा होण्यास बंदी घालण्यात आली आहे.
आणखी वाचा : ऐश्वर्या राय बच्चनचा ‘तो’ जुना व्हिडिओ व्हायरल; नेपोटीजम अन् आलिया भट्टबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
सलमानच्या घराबाहेर त्याचे बरेच चाहते घुटमळताना दिसतात, तसेच मुंबई फिरायला येणारा प्रत्येक पर्यटक सलमानच्या घराबाहेर येऊन फोटो काढतोच. पण सध्या सलमानच्या घराबाहेर या चाहत्यांना फिरकता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, सलमानच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, “या गोष्टींचा अभिनेत्याला फरक पडत नाही. सलमान ही धमकी अगदी सामान्य पद्धतीने घेत आहे. तसेच पालकांना त्रास होऊ नये म्हणून कदाचित तो तसं भासवतोय.”
दरम्यान, सलमान खानचा जवळचा सहकारी प्रशांत गुंजाळकर याला शनिवारी धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. मेल पाठवणाऱ्या तरुणाचं नाव रोहित गर्ग असल्याची माहिती समोर येत आहे. सलमान खानच्या टीमने संशयित आरोपी रोहित गर्ग, गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे.