बॉलीवूडचे कलाकार अनेकविध कारणांनी चर्चेत असतात. बऱ्याचदा या कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कधी चित्रपटातील भूमिका न आवडल्याने, कधी अभिनय न आवडल्याने तर कधी पोस्ट केलेले फोटो, व्हायरल झालेले व्हिडीओ, मुलाखतींदरम्यान केलेले वक्तव्य, वैयक्तिक गोष्टी अशा अनेक कारणांमुळे या कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनांतर त्यांच्या कुटुंबाला ट्रोलिंगचा सामना करावा लागल्याचा खुलासा त्यांची मुलगी रिद्धीमा कपूरने केला आहे.
रिद्धिमा कपूर आई नीतू कपूरसह नेटफ्लिक्सच्या ‘फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ (Fabulous Lives of Bollywood Wives) या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सीझनमध्ये दिसली.
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर कुटुंबाला करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना
रिद्धिमा कपूरने नुकतीच गल्लाटा इंडियाला मुलाखत दिली. यावेळी २०२० मध्ये ऋषी कपूर यांच्या निधनानंतर कुटुंबाला केलेल्या ट्रोलिंगबद्दल बोलताना रिद्धिमाने म्हटले, “अशी एक वेळ होती, जेव्हा लोक आम्हाला म्हणायचे, ते तर आनंदी दिसत आहे. ते बाहेर फिरायला जात आहेत. पण त्यांनी घरी येऊन पाहिले आहे का की काय झाले आहे. ते फक्त जे बाहेर दिसतं तितकच बघतात. चेहऱ्यावर सगळं काही चांगलंच चाललं आहे, असं दिसतं. पण आम्ही कोणत्या परिस्थितीतून जात होतो, हे पाहण्यासाठी लोक नव्हते.”
पुढे रिद्धिमाने म्हटले, “जर एखादा व्यक्ती त्याच्या भावना उघडपणे दाखवत नसेल, तर याचा अर्थ असा नाही की, तो त्या दु:खातून जात नाही. कुठलेच दु:ख, वेदना हे लहान किंवा मोठे असे नसते. जेव्हा लोक म्हणतात की एखाद्या व्यक्तीला विशेष अधिकार आहेत, फायदे आहेत किंवा त्याच्याकडे सगळे काही आहे, त्यावेळी तुम्हाला माहित आहे का की ती व्यक्ती असुरक्षिततेचा सामना करत आहे.”
दरम्यान, ‘फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’च्या आधीच्या सीझन मध्ये महिप कपूर, भावना पांडे, सीमा सजदेह, नीलम कोठारी सोनी हे दिसत होते. या सीझनमध्ये इतर नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, एकता कपूर दिसत आहेत.