बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार व इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत असलेला ‘सेल्फी’ हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. कॉमेडी ड्रामा असलेल्या अक्षय कुमारच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. २०२३ या नववर्षातील खिलाडी कुमारचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही अक्षयच्या या चित्रपटाकडून अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरला नसल्याचं चित्र आहे.
अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिसवरील आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाला प्रदर्शनाच्या दिवशी काही खास कामगिरी करता आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, ‘सेल्फी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ तीन कोटींची कमाई केली आहे. अक्षय कुमारच्या कारकीर्दीतील हा पहिल्या दिवसाची सर्वात कमी कमाई असलेला चित्रपट ठरला आहे. इतकंच नाही तर आता अक्षय कुमारच्या आंतरराष्ट्रीय कॉन्सर्टलासुद्धा चांगलाच फटका बासल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा : “चाळीच्या एका खोलीत तेव्हा…” मनोज बाजपेयीने सांगितला मुंबईत स्ट्रगलच्या दिवसातील धमाल किस्सा
‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार अक्षय कुमार आणि काही बॉलिवूड सेलिब्रिटी मिळून परदेशात आयोजित करत असलेला ‘द एंटरटेनर्स’ हा कॉन्सर्ट काही कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात होणारा हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. या शहरात या कॉन्सर्टसाठी फारशी मागणी आणि उत्सुकता दिसत नसल्याने आयोजकांनी हा शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कॉन्सर्टचे प्रमोटर अमित जेटली यांनी यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “कार्यक्रमाची तिकीटं फारशी विकली जात नसल्याने आणि या शहरात या कार्यक्रमासाठी फारशी उत्सुकता नसल्याने हा शो रद्द करण्यात आला आहे. शिवाय या कॉन्सर्टसाठी ज्यापद्धतीचं मार्केटिंग अपेक्षित होतं तसं काहीच न झाल्याने आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे. शिवाय ज्यांनी तिकीटं बूक केली आहेत त्यांचे पैसेदेखील आयोजक परत करणार आहेत.”
न्यू जर्सीमधील शो रद्द झाला असला तरी इतर शहरातील ४ शोज ठरल्याप्रमाणे पार पडणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. जॉर्जिया, टेक्सस, फ्लोरिडासारख्या शहरात हा कॉन्सर्ट ठरल्यानुसार होणार आहे. नुकतंच यातील कलाकारांनी या कॉन्सर्टची रंगीत तालिम मुंबईमध्ये केली होती. या कॉन्सर्टमध्ये अक्षय कुमारसह दिशा पटानी, नोरा फतेही, मौनी रॉय, अपारशक्ती खुराना, सोनम बाजवा, जसलीन रॉयलसारखे कलाकारही सहभाग घेणार आहेत. या कॉन्सर्टमध्ये अक्षय कुमार त्याच्या काही जुन्या हीट गाण्यांवर आणि काही रीमिक्स गाण्यांवर थिरकणार आहे.