रणवीर सिंग हा बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे. त्याच्या कामाचं नेहमीच प्रेक्षकांकडून कौतुक होत असतं. याचबरोबर त्याच्या दिलखुला स्वभावामुळेही तो नेहमीच चर्चेत असतो. आतापर्यंत त्याने अनेक उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या दिले. पण आता बॉलीवूडमधील एका बिग बजेट चित्रपटातून त्याला काढता पाय घ्यावा लागला आहे.
‘द इंमॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटाची गेले अनेक महिने प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका करण्यासाठी सुरुवातीला विकी कौशलला कास्ट करण्यात आलं होतं. पण काही महिन्यांपूर्वी काही कारणाने तो या चित्रपटातून बाहेर पडला. तर यानंतर त्याच्या जागी रणवीर सिंगला प्रमुख भूमिकेसाठी निवडण्यात आलं. मात्र आता त्यालाही हा चित्रपट गमवावा लागला आहे.
तीन-चार महिन्यांपूर्वी विकी या चित्रपटातून बाहेर पडल्याची बातमी समोर आली होती. या पाठोपाठ या चित्रपटाचा निर्माता रॉनी स्क्रूवाला यानेही काढता पाय घेतला. त्यानंतर हा चित्रपट जिओ स्टुडिओज निर्मित करणार आहे आणि त्यांनी या चित्रपटाचे बजेट ६०० कोटी ठेवलं आहे असं समोर आलं होतं. तर रणवीर सिंग या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार हेही निश्चित झालं होतं. पण आता ‘इ टाइम्स’च्या वृत्तानुसार आता रणवीरने या चित्रपटातून एग्झिट घेतली आहे.
हेही वाचा : Video: “काम तर करत नाही फक्त…,” ‘त्या’ कृतीमुळे रणवीर सिंग ट्रोल
तर या चित्रपटामध्ये आता प्रमुख भूमिका साकारण्यासाठी निर्माते ज्युनिअर एनटीआर किंवा अल्लू अर्जुन या दोन नावांचा विचार करत आहेत. जार् यांच्यातली बोलणी यशस्वी झाली तर या दोघांपैकी कोणीतरी एक अभिनेता या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याचबरोबर या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री समांथा रूथ प्रभू तिच्या नावाची चर्चा सुरू असल्याचंही बोललं जात आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.