बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार त्याचे अतरंगी स्टंट, विनोदी डायलॉग्ज आणि जबरदस्त अॅक्शनसाठी ओळखला जातो. अक्षयने सिनेविश्वात आजवर अनेक विविधांगी भूमिका लीलया पेलल्या आहेत. अनेक चित्रपटांतून तो एक हरहुन्नरी अभिनेता आहे हे त्याने दाखवून दिले आहे. अशात बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता आता ‘टेलीप्रॉम्प्टर अॅक्टर’ म्हणून व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर नुकताच अक्षय कुमारचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण अक्षयचा ‘सरफिरा’ चित्रपट पाहत आहे. चित्रपट पाहताना अक्षय कुमार त्याचे डायलॉग्ज पाठ न करता टेलीप्रॉम्प्टरवर बघून वाचत असल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच या व्हिडीओमध्ये त्याने याची अनेक उदाहरणेसुद्धा दिली आहेत. एका डायलॉगमध्ये अक्षय रागारागात समोरच्या व्यक्तीशी संवाद साधत आहे. मात्र, असे करताना त्याची नजर खाली आहे.

व्हिडीओमध्ये अनेक गंभीर प्रसंगांमध्येही अक्षय कुमार त्याचे संवाद वाचताना खाली किंवा अन्य दुसरीकडे पाहत असल्याचे दिसत आहे. तसेच त्याची नजर पाहून तो काहीतरी वाचत आहे हे समजत असल्याचे व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर यावर प्रसिद्ध दिग्दर्शक, कोरिओग्राफर, निर्माता अहमद खानने प्रतिक्रिया दिली आहे.

अहमद खानने नुकतीच ‘बॉलीवूड बबल’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला अक्षय कुमारच्या व्हायरल व्हिडीओबद्दल विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, “ही एक कला आहे. अनेक कलाकार त्यांचे डायलॉग्ज अगदी चोख पाठ करतात. मात्र, तितक्याच ऊर्जेने आणि प्रभावीपणे त्यांना ते मांडता येत नाहीत. अशात अक्षय कुमार त्याच्याकडून स्वत: अनेक गोष्टी आणि डायलॉग्ज चित्रपटात अॅड करत असतो.”

“चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना अक्षय कुमारला डायलॉग्ज पाठ करण्यास सांगितल्यास तो म्हणतो, “मी आता शाळेत थोडी शिकत आहे, तेव्हा पाठांतर करेन. त्यामुळे तो त्याचे काही डायलॉग्ज वाचून बोलतो”, असे अहमद खान म्हणाला. त्याने पुढे अक्षयच्या कामाचं कौतुकही केलं. तो म्हणाला, “अक्षय डायलॉग्ज अशा पद्धतीने बोलत असला तरी तो स्वत: त्यामध्ये काही मनाची वाक्यंसुद्धा टाकतो आणि तो सीन आणखी मजेदार बनवतो.”

“जसं की, ‘बहन डर गई’, ‘चल चल अपने बाप को मत सीखा’ असे अनेक गाजलेले आणि अनेकांच्या लक्षात राहिलेले डायलॉग्ज तो स्वत: घेत असतो. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. अक्षयच्या कामाची पद्धत अशी आहे”, असं अहमद खान म्हणाला.

Story img Loader