बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या आईबरोबर ती विविध कार्यक्रमांत दिसते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. अशात आराध्या आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आली आहे. याचं कारण म्हणजे तिनं पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आराध्य बच्चननं तिच्या आरोग्याबद्दल गूगल आणि अन्य वेबसाइटवर असलेल्या खोट्या माहितीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवारी या प्रकरणी सुनावणी पार पडली. दाखल याचिकेनुसार आता दिल्ली उच्च न्यायालयानं गूगल, तसेच अन्य काही वेबसाइटना नोटीस पाठवली आहे.
नेमकं प्रकरण काय?
आराध्यानं एप्रिल २०२३ मध्ये वडील अभिषेक बच्चनच्या मदतीनं न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये तिनं गूगल, तसेच यूट्यूब आणि अन्य वेबसाइटवर तिच्या आरोग्याविषयी चुकीची माहिती देण्यात आल्याचं तिनं म्हटलं होतं. त्यावेळी न्यायालयाकडून यूट्यूबला आराध्याच्या आरोग्याविषयी चुकीची माहिती देणारे व्हिडीओ हटवण्यास सांगण्यात आले होते. तसेच गूगलवरून ही माहिती काढण्याचे आदेश देण्यात आले होते.
२०२३ मध्ये झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांनी म्हटले होते, “एका अल्पवयीन मुलीबद्दल अशी माहिती पसरवणं हे कायद्याचं उल्लंघन आहे. त्यामुळे अशी माहिती तातडीने काढून टाकावी, तसेच भविष्यात असा प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी. केंद्र सरकारने अशी माहिती ब्लॉक करावी. तसेच, गूगलनं नियमांचं पालन करावं.” मात्र, अद्यापही काही व्हिडीओ आणि खोटी माहिती गूगलवर असल्याने आराध्यानं पुन्हा एकदा न्यायालय धाव घेतली.
आराध्याच्या आरोग्याविषयी कोणती खोटी माहिती पसरवण्यात आली?
आराध्यानं दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं, तिला एक गंभीर आजार असल्याची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. तसेच काही वेबसाइटवर चक्क तिच्या निधनाचीदेखील माहिती देण्यात आल्याचं तिनं याचिकेत नमूद केलं आहे.
पुढील सुनावणी केव्हा?
आराध्या बच्चनविषयीच्या खोट्या माहितीप्रकरणी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. गूगलबोरबर अन्य वेबसाइटनाही नोटीस पाठवल्यानंतर या प्रकरणी पुढील सुनावणी आता १७ मार्चला होणार आहे.
आराध्या बच्चन ही एक स्टारकिड आहे. १३ वर्षांची आराध्य कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. बॉलीवूडच्या अनेक कार्यक्रमांत ती आई ऐश्वर्या राय बच्चन आणि बाबा अभिषेक बच्चनबरोबर दिसते. तिच्याविषयी अशी माहिती पसरल्याचे पाहून चाहत्यांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.