Aishwarya Rai shares photo with Abhishek Bachchan: अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन हे सेलिब्रिटी जोडपे नेहमीच चर्चेत असल्याचे दिसते. अनंत अंबानीच्या लग्नात जेव्हा ऐश्वर्या तिच्या लेकीसह म्हणजे आराध्यासह पोहोचली. तर, अभिषेक बच्चन त्याच्या संपूर्ण कुटुंबासह पोहोचला होता.
अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चनने लग्नात वेगवेगळी हजरी लावल्याने चर्चांना उधाण आले होते. ते एकत्र का आले नाहीत? ऐश्वर्या बच्चन कुटुंबाबरोबर का आली नाही? असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून विचारले जात होते. त्यानंतर ऐश्वर्या व अभिषेक लवकरच वेगळे होणार असल्याचे म्हटले जात होते. हे जोडपे घटस्फोट घेत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यात भर म्हणजे विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी ऐश्वर्या तिच्या लेकीसह हजेरी लावत असल्याचे पाहायला मिळाले.
ऐश्वर्या व अभिषेक अनेक दिवस एकत्र कुठे दिसले नसल्यामुळे या दोघांमध्ये दुरावा आल्याचे नेटकरी म्हणत होते. तसेच या सगळ्याला अभिनेत्री निम्रत कौर जबाबदार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, या चर्चांवर बच्चन कुटुंब अथवा ऐश्वर्या-अभिषेक यांनी कधीच कोणतेही वक्तव्य केले नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका लग्नात एकत्र हजेरी लावली होती. त्यानंतर आराध्याच्या शाळेतील एका कार्यक्रमाला ऐश्वर्या-अभिषेकसह अमिताभ बच्चन यांनीदेखील हजेरी लावली होती. आता ऐश्वर्या रायने सोशल मीडियावर फोटो शेअर करीत घटस्फोटाच्या चर्चा खोट्या ठरविल्या आहेत.
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनबरोबरचा फोटो केला शेअर
अभिषेक व ऐश्वर्या यांच्या लग्नाला २० एप्रिलला १८ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने ऐश्वर्या व अभिषेकने सेलिब्रेशन केले. त्याची झलक ऐश्वर्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळाली. यामध्ये त्यांची मुलगी आराध्या बच्चनदेखील दिसत आहे. यामध्ये तिघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. ऐश्वर्याने हा फोटो शेअर करताना एक हार्ट इमोजी शेअर केली.
या दोघांना एकत्र बघून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “अखेर, सगळं ठीक झालं. कुटुंबापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही.”आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्हाला खूप काळानंतर एका फ्रेममध्ये पाहून खूप आनंद झाल.” तर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


ऐश्वर्या रायच्या कामाबद्दल बोलायचे, तर ती याआधी मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन २ या चित्रपटात दिसली होती. चित्रपटातील तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. तसेच विविध स्तरांतून मोठे कौतुक झाल्याचेदेखील पाहायला मिळाले. अद्याप तिने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळे ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर अभिषेक बच्चनबद्दल बोलायचे, तर तो बी हॅपी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसला होता. लवकरच तो हाऊसफुल ५ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांनी २००७ मध्ये लग्नगाठ बांधली होती.