बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला अभिनय क्षेत्रात आता जवळपास २५ वर्षे झाली आहेत. एवढ्या मोठ्या करिअरच्या काळात ऐश्वर्याने रोमँटिक, थ्रीलर, अॅक्शन, ऐतिहासिक असे सर्व प्रकारचे चित्रपट केले आहेत. पण या चित्रपटांमध्ये तिने फारसे इंटिमेट सीन किंवा किसिंग सीन्स दिलेले नाहीत. १९९७ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ऐश्वर्या सुरुवातीपासूनच रोमँटिक आणि इंटिमेट सीन्सपासून दूर राहत असे. अर्थात तिने ही पॉलिसी ‘धूम २’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’च्या वेळी तोडली. एकीकडे इतर बॉलिवूड अभिनेत्री कथेची गरज असल्यास अशाप्रकारचे सीन देण्यास कचरत नाहीत तर दुसरीकडे ऐश्वर्या मात्र या सगळ्यापासून नेहमीच लांब राहताना दिसते. जेव्हा एका मुलाखतीत ऐश्वर्याला इंटिमेट सीन्सशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी ती त्या पत्रकारावर चिडली होती.
ऐश्वर्या राय बच्चनचा आज ४९ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात तिच्या आयुष्यातील इंटिमेट सीनच्या प्रश्नाचा किस्सा. जेव्हा ऐश्वर्याला इंटिमेट सीन्ससंबंधी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती खूप नाराज झाली होती आणि संबंधीत पत्रकाराला तिने सडेतोड उत्तर दिलं होतं. हे तेव्हा घडलं होतं जेव्हा ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिचा हॉलिवूड चित्रपट ‘द पिंक पँथर २’ चित्रपट प्रमोट करण्यासाठी पोहोचली होती. त्यावेळी परदेशी पत्रकाराने ऐश्वर्याला, “चित्रपटांमध्ये कपडे उतरवणे किंवा इंटिमेट सीन करताना तू कंफर्टेबल का नसतेस?” असा प्रश्न विचारला होता.
ऐश्वर्याने या प्रश्नाचं उत्तर सडेतोड उत्तर देत त्या पत्रकाराची बोलतीच बंद केली होती. ती म्हणाली होती, “मी कधीही मोठ्या पडद्यावर कामुकता किंवा नग्नता दाखवलेली नाही आणि असं करण्यात मला भविष्यातही कोणत्याही प्रकारची रुची नाही.” पण ऐश्वर्याच्या या उत्तरावर त्या पत्रकाराचं समाधान झालं नाही आणि त्याने ऐश्वर्याला आणखी काही विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याला मध्येच थांबवत ऐश्वर्या म्हणाली, “मला असं वाटतंय की मी एका स्त्रीरोगतज्ज्ञाशी बोलत आहे. तू पत्रकार आहे ना मग तसाच राहा.”
ऐश्वर्या रायच्या या मुलाखतीचा व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाला होता. चाहत्यांनी ऐश्वर्याच्या उत्तराचं कौतुक करत त्या पत्रकारावर खूप टीका केली होती. दरम्यान अशाप्रकारे परदेशी पत्रकारांची बोलती बंद करण्याची ऐश्वर्याची ही पहिलीच वेळ नव्हती याआधीही तिने २००५ मध्ये अमेरिकन टीव्ही होस्ट डेव्हिड लेटरमॅनला उत्तर दिलं होतं. त्यावेळी डेव्हिडने तिला भारतीय संस्कृती आणि भारतीय आपल्या पालकांसह का राहतात यासंबंधी प्रश्न विचारला होता.
डेव्हिड लेटरमॅनने या मुलाखतीत ऐश्वर्याला, “तू अजूनही तुझ्या पालकांबरोबर राहतेस का? भारतात पालकांबरोबर राहणं खरंच सामान्य बाब आहे का?” असा प्रश्न विचारला होता. खरं तर त्याने असं विचारून ऐश्वर्या आणि भारतीय संस्कृतीची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ऐश्वर्याने त्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. ऐश्वर्या म्हणाली होती, “पालकांबरोबर राहण्यात काहीच वाईट नाही. आम्ही सगळेच भारतीय आमच्या पालकांबरोबर राहतो. भारतात हे खूपच सामान्य आहे की आम्हाला आमच्या पालकांना भेटण्यासाठी किंवा त्याच्याबरोबर लंच किंवा डिनर करण्यासाठी त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही.” ऐश्वर्याचं हे उत्तर ऐकल्यानंतर डेव्हिडची बोलतीच बंद झाली होती.
दरम्यान ऐश्वर्या राय बच्चनच्या कामाबद्दल बोलायचं तर तिचा अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘पोन्नियन सेल्वन १’ बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. ऐश्वर्याच्या अभिनयाचं बरंच कौतुकही झालं. आगामी काळात ती याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. जो २०२३ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.