Aishwarya Rai Bachchan : बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या गाडीला मुंबईत बसने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी ( २६ मार्च ) ही घटना घडली. पापाराझी पेज ‘वरिंदर चावला’ याने ऐश्वर्या रायच्या गाडीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या गाडीला बसने धडक दिल्यावर रस्त्यावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

ऐश्वर्या नेहमी तिची लग्झरी गाडी टोयोटा वेलफेयरमधून प्रवास करते. अभिनेत्रीच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर बेस्ट बसने तिच्या गाडीला धडक दिल्याची घटना घडली आहे. याचे अनेक व्हिडीओ देखील पापाराझी पेजेसवरून शेअर करण्यात आले आहेत. ऐश्वर्याच्या गाडीचा अपघात झाल्याचं समजताच तिच्या सगळ्या चाहत्यांनी अभिनेत्रीबद्दल काळजी व्यक्त केली होती. आता याबद्दल तिच्या मॅनेजरने माहिती दिली आहे.

ऐश्वर्याच्या गाडीला बसने धडक दिली, तेव्हा घटनास्थळी गर्दी जमली होती. यानंतर तिच्या कारचा चालक आणि बॉडीगार्ड रस्त्यावर उतरुन गाडीची तपासणी करत होते. यामध्ये कोणाचंही गंभीर नुकसान झालेलं नाही. थोडावेळ गाडीची तपासणी केल्यावर ऐश्वर्याच्या अंगरक्षकांनी गाडी घटनास्थळावरून नेली.

ऐश्वर्या रायच्या कारला बसने धडक दिल्याच्या वृत्ताला तिच्या वैयक्तिक मॅनेजरने देखील ‘एबीपी न्यूज’शी संवाद साधताना दुजोरा दिला आहे. बेस्ट बसने धडक दिली तेव्हा ऐश्वर्या गाडीत उपस्थित नव्हती. सर्व काही ठीक आहे अशी प्रतिक्रिया मॅनेजरने दिली आहे.

दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चनच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती मणिरत्नमच्या ‘पोन्नियिन सेल्वन: पार्ट २’ मध्ये झळकली होती. याशिवाय काही महिन्यांपूर्वीच ऐश्वर्याला दुबईतील ‘साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स’मध्ये (SIIMA) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.