अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. अनेकदा तिच्या चित्रपटांतील भूमिकांची चर्चा होताना दिसते. तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अभिनेत्री चर्चेत असते. आता तिची मुलगी आराध्यामुळे ऐश्वर्या राय चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाली ऐश्वर्या राय बच्चन?
इंटरनॅशनल इंडियन फिल्म ॲकॅडमी (आयफा) अवॉर्ड्स 2024 मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायने हजेरी लावली होती. तिच्याबरोबर तिची लेक आराध्यादेखील दिसली. यावेळी तुझ्यासारखे सुपरमॉम कसे होता येईल, त्यासाठी काय सल्ला देशील? यावर अभिनेत्रीने मातृत्वाची सार्वत्रिक संकल्पना नाकारत म्हटले, “तू आई आहेस आणि तुला तुझ्या मुलीसाठी उत्तम माहित आहे. आपण सगळे माणूस आहोत. आपण बसून एकमेकांना सल्ले देणार नाही. अशी कोणतीही नियमांची वही नाही जिच्याबरोबर आपला जन्म झाला आहे. त्यामुळे तुला जे करायचं आहे ते कर. कारण तू तुझ्या मुलीसाठी उत्तम आहेस”, ऐश्वर्याने आयफा पुरस्कार सोहळ्याच्या ग्रीन कार्पेटवर एनडीटीव्ही(NDTV)बरोबर असा संवाद साधल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तिच्याबरोबर आराध्यादेखील होती.
आराध्या बच्चन ही अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आहे. ती आपल्या आईबरोबर अनेक सोहळ्यांना उपस्थिती लावताना दिसते. ऐश्वर्याबरोबरच्या तिच्या बॉन्डिंगची मोठी चर्चा होताना दिसते. ऐश्वर्या राय बरोबरच आराध्यादेखील लक्ष वेधून घेत असते.
एकेकाळी अभिनेत्री यशाच्या शिखरावर होती. चित्रपटांमध्ये अत्यंत व्यग्र असलेली दिसायची. मात्र २०११ मध्ये आराध्याच्या जन्मानंतर तिच्यावर लक्ष केंद्रित केले. २०१५ ला तिने चित्रपटसृष्टीत पुन्हा पदार्पण केले. मात्र आता अनेक चित्रपटात काम करण्यापेक्षा ती तिला आवडणाऱ्या भूमिका करत मोजके प्रकल्प निवडताना दिसते.
दरम्यान, गेल्या काही काळापासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला असल्याचे म्हटले जात आहे. ते घटस्फोट घेत वेगळे होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चटच्या विवाहसोहळ्यात या चर्चांनी जोर धरला होता. कारण- या सोहळ्यात अभिषेक बच्चनने त्याच्या संपूर्ण कुटुंबासह हजेरी लावली होती. तर ऐश्वर्या आपल्या लेकीसह हजर राहिली होती. मात्र त्यांच्या नात्यावर बच्चन कुटुंबीय, अभिषेक बच्चन किंवा ऐश्वर्या यांनी कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही. २००७ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती.