दमदार अभिनय आणि मनमोहक सौंदर्य यामुळे सतत चर्चेत असणारी ऐश्वर्या राय बच्चन गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब होती. २०१८ मध्ये तिचा ‘फन्ने खान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सप्टेंबर महिन्यामध्ये ‘पोन्नियिन सेल्वन भाग १’ या चित्रपटाद्वारे तिने तब्बल चार वर्षांनंतर कमबॅक केले. या चित्रपटामध्ये तिने नंदिनी हे पात्र साकारले होते. मणी रत्नम यांच्याशी ऐश्वर्याचे खास नातं आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘इरुवर’ या दाक्षिणात्य चित्रपटाद्वारे ऐश्वर्याने मनोरंजनविश्वामध्ये पदार्पण केले होते. ‘PS 1’, ‘इरुवर’ व्यतिरिक्त तिने मणी रत्नम यांच्या ‘गुरु’, ‘रावण’ अशा चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
प्रसिद्धीच्या शिखरावर असताना ती बच्चन कुटुंबाची सून बनली. अमिताभ आणि जया यांच्या मुलाशी, अभिषेक बच्चनशी तिने लग्न केले. त्यांच्या मुलीचे नाव आराध्या असे आहे. अन्य स्टारकिड्सप्रमाणे आराध्याही खूप लोकप्रिय आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. आज तिचा ११ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने ऐश्वर्याने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आराध्याला ओठांवर किस करत असल्याचे दिसते.
“माझं प्रेम, माझं आयुष्य, आय लव्ह यू, माझी आराध्या” असे कॅप्शन ऐश्वर्याने या फोटोला दिले आहे. त्या दोघींचा हा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवर कमेंट करत लोकांनी आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी या फोटोंवरुन ऐश्वर्याचे कौतुक केले आहे, तर लेकीला ओठांवर किस केल्याने काहीजण ऐश्वर्याला ट्रोल करत आहेत. चाहते तिची बाजू घेऊन ट्रोल करणाऱ्यांशी भांडत आहेत.
आणखी वाचा – “आठ वर्षांचं प्रेम आहे माझं पण…” गर्लफ्रेंडचे पत्र वाचताच अक्षय केळकर ढसाढसा रडला
‘पोन्नियिन सेल्वन’चे प्रमोशन करण्यामध्ये ऐश्वर्या खूप व्यग्र होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ती मुंबईला परतली. सध्या ती बच्चन कुटुंबियासह सुट्टीचा आनंद घेत आहे. काही दिवसांमध्ये तिच्या ‘PS 2’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे.