सलमान खानशी ब्रेकअप झाल्यावर ऐश्वर्या रायचं नाव बॉलीवूडचा चॉकलेट बॉय विवेक ओबेरॉयशी जोडलं गेलं होतं. ऐश्वर्या आणि विवेक काही वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघांचे एकत्र जुने फोटो आजही व्हायरल होत असतात. याशिवाय ऐश्वर्यामुळे सलमान आणि विवेकमध्ये झालेला वाद सुद्धा सर्वत्र चर्चेत आला होता. यामुळे विवेकला बॉलीवूडमधून बॉयकॉट करण्यात आलं होतं. या सगळ्या घडामोडींनंतर अखेरीस २००४ मध्ये विवेक आणि ऐश्वर्या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं वृत्त समोर आलं.
ऐश्वर्याने पुढे वैयक्तिक आयुष्यात २००७ मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केलं. लग्नानंतर एका पुरस्कार सोहळ्यात असं काही घडलं ज्यामुळे ऐश्वर्या राय अस्वस्थ झाली होती…या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पुरस्कार सोहळ्याचं होस्टिंग विवेक ओबेरॉय करत होता. या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे जाणून घेऊयात…
अभिषेकबरोबर लग्न झाल्यावर ऐश्वर्याने सासरेबुवा अमिताभ बच्चन यांच्यासह एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी ऐश्वर्या व बिग बी एकमेकांच्या बाजूला बसून चर्चा करत, हसत असल्याचं सुरुवातीला पाहायला मिळतं. मात्र, विवेक ओबेरॉय जसा रंगमंचावर एन्ट्री घेतो तसे त्याला पाहून ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात…ती काहीशी अस्वस्थ झाल्याचं यामध्ये पाहायला मिळतंय.
विवेकशी नजरानजर होऊ नये म्हणून ऐश्वर्याने स्टेजकडे दुर्लक्ष करून मान फिरवल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तिच्या शेजारी बसलेले अमिताभ बच्चन सुद्धा विवेकचं नाव ऐकून काहीसे शांत दिसत होते. विवेकने होस्टिंग सुरू करताच ऐश्वर्या स्टेजकडे दुर्लक्ष करून डिझायनर मनीष मल्होत्राशी गप्पा मारताना दिसली. जेणेकरून तिचं लक्ष दुसरीकडे जाईल.
यानंतर विवेक स्टेजवरून उतरल्यावर मनीष मल्होत्राच्या शेजारीच जाऊन बसला. म्हणजेच मनीषच्या एका बाजूला ऐश्वर्या तर, दुसऱ्या बाजूला विवेक बसला होता. यामुळे अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरचे सगळे भाव बदलले होते. ती आणखी अस्वस्थ झाली होती. हा पुरस्कार सोहळा चर्चेचा विषय ठरला होता. पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीला झालेल्या अस्वस्थतेमुळे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं होतं.
दरम्यान, विवेक ओबेरॉयने सलमान विरोधात पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्याचं आणि ऐश्वर्या रायचं नातं तुटलं होतं. २००४ ते २००५ च्या दरम्यान या दोघांचं ब्रेकअप झालं होतं. पुढे ऐश्वर्याने एप्रिल २००७ मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केलं, तर विवेकने ऑक्टोबर २०१० मध्ये प्रियांका अल्वाशी लग्नगाठ बांधली.