Aishwarya Rai on Kissing Scene: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली होती. तिने अभिषेक बच्चन व तिच्या लग्नाच्या १८ व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.
ऐश्वर्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिषेक, ऐश्वर्या व त्यांची मुलगी आराध्या यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळाले. या कुटुंबाला एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. अभिनेत्री अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखली जाते.देवदास, हम दिल दे चुके सनम अशा अनेक चित्रपटांतील तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अभिनेत्रीला मोठी लोकप्रियता मिळाली.
ऐश्वर्या राय बच्चनने २०१२ मध्ये डेली मेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने असे म्हटले होते की तिने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या. याचे कारण म्हणजे त्या चित्रपटातील किसिंग सीन करण्यास तिला अवघडल्यासारखे व्हायचे. याबरोबरच, तिने या मुलाखतीत असाही खुलासा केला होता की धूम २ चित्रपटातील किसिंग सीनसाठी तिला कायदेशीर नोटीस आल्या होत्या.
ऐश्वर्या राय काय म्हणाली होती?
ऐश्वर्या राय म्हणाली होती, “मी काही पाश्चात्य सिनेमांतील भूमिकाही नाकारल्या. त्याआधी ऑनस्क्रीन किसिंग सीनचे शूट केले नव्हते. मी धूम २ मध्ये किसिंग सीन शूट केला होता. त्यासाठी मला काही लोकांकडून कायदेशीर नोटीस आल्या होत्या. त्यांचे म्हणणे असे होते की तू आमच्या मुलींसाठी आदर्श आहेस. तू इतक्या चांगल्या पद्धतीने तुझं आयुष्य जगत आहे. पडद्यावर तुला असं बघणं, त्यांना आवडत नाही. तरीसुद्धा तू हे का केलंस? मला असे वाटले की मी एक कलाकार आहे आणि मी माझे काम केले आहे. दोन-तीस तासाच्या चित्रपटातील दोन-तीन सेकंदासाठी माझ्याकडून स्पष्टीकरण मागितलं जात आहे.”
पुढे ऐश्वर्या राय असे म्हणाली होती की अनेक कलाकार असे सीन करतात. पण भारतीय संस्कृतीत सार्वजनिकरित्या असे प्रेमाचे प्रदर्शन करणे, हे सामान्य नाही. आपल्या सिनेमात कलाकारांना ऑनस्क्रीन किसिंग सीन करताना अवघडल्यासारखे वाटते.
‘धूम २’ बद्दल बोलायचे तर ऐश्वर्या राय व हृतिक रोशनची चित्रपटातील केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली होती. हा चित्रपट संजय गांधी यांनी दिग्दर्शित केला होता.या चित्रपटात हृतिक रोशन व ऐश्वर्या रायबरोबरच अभिषेक बच्चन, बिपाशा बसू, उदय चोप्रा महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र, किसिंग सीनमुळे ऐश्वर्या रायला टीकेला सामोरे जावे लागले.
ऐश्वर्या रायच्या कामाबद्दल बोलायचे तर अभिनेत्री पोन्नियन सेल्व्हन २ मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसली होती. मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले. आता अभिनेत्री कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.