बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर तिला इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. तिचा हा चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला होता. पण १९९६ मध्ये तिने एका चित्रपटाची ऑफर नाकारली होती.

तिने जो चित्रपट नाकारला तो तिच्या पहिल्या चित्रपटापेक्षा मोठा हिट होता. यामध्ये नंतर कपूर कुटुंबातील लेकीने काम केलं होतं. ऐश्वर्या रायने नाकारलेला चित्रपट म्हणजे ‘राजा हिंदुस्तानी’ होय. तिने या सिनेमाची ऑफर नाकारली. हा त्यावर्षीच्या सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. ऐश्वर्या रायने नकार दिल्यानंतर निर्मात्यांनी मनीषा कोईराला, पूजा भट्ट आणि जुही चावला यांना या चित्रपटाची ऑफर दिली. पण त्या सर्वांनीही नकार दिला. नंतर सर्वात शेवटी करिश्मा कपूरला ‘राजा हिंदुस्तानी’ची ऑफर देण्यात आली.

‘राजा हिंदुस्तानी’ बजेट अन् कलेक्शन

आमिर खानच्या या चित्रपटाने करिश्मा कपूरला रातोरात सुपरस्टार बनवलं. ५.७६ कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने जगभरात ७६.३४ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा आणि १९९० च्या दशकातील भारतातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. इतर सर्वाधिक कमाई करणारे तीन चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’ व ‘हम आपके है कौन’ हे होते.

‘राजा हिंदुस्तानी’मधील आमिर खान व करिश्मा कपूर यांच्या केमेस्ट्रीची जोरदार चर्चा झाली होती. दोघांचा किसिंग सीनही खूप चर्चेत राहिला होता. तसेच या दोघांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. करिश्माने आरती नावाची भूमिका केली होती. नंतर २००२ मध्ये ‘राजा हिंदुस्तानी’चा रिमेक बनवण्यात आला होता.

raja hindustani
राजा हिंदुस्तानी चित्रपटातील एक सीन (फोटो – स्क्रीनशॉट)
हेही वाचा
‘ती’ एक अट अन् हेमा मालिनी-संजीव कुमार यांच्यातील नातं संपलं; पुन्हा कधीच दिसले नाही एकत्र, संजीव आयुष्यभर राहिले अविवाहित

‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केलं होतं. २८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची गाणी आजही श्रोते ऐकत असतात. या चित्रपटाची कथा, गाणी, कलाकार सगळंच कमाल होतं. ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटात आमिर खान, करिश्मा कपूर, सुरेश ओबेरॉय, अर्चना पुरन सिंह, जॉनी लिव्हर यांसारखे अनेक कलाकार होते.