Aishwarya Rai Return To Work : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे लग्नाच्या १७ वर्षांनंतर विभक्त होणार या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या चर्चा असूनही या जोडीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी या चर्चांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून ते आपल्या आयुष्यात आणि करिअरमध्ये पुढे जात आहेत .
अभिषेक काही दिवसांपूर्वी आलेल्या त्याच्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र दिसला, तर ऐश्वर्या कामावर परतली असल्याचे दिसते. अलीकडेच प्रसिद्ध सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट अॅड्रियन जेकब्स याने ऐश्वर्याबरोबरचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. ते दोघे एका प्रोजेक्टसाठी एकत्र काम सुरू करणार असल्याची त्याने घोषणा केली. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करत लिहिले, “ऐश्वर्या रायबरोबर कामाचा सुंदर दिवस,” या फोटोत ऐश्वर्या काळ्या जॅकेटमध्ये दिसत असून या फोटोतील तिच्या हास्याने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. तिच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल अजून फारशी माहिती उपलब्ध नसली तरी ऐश्वर्याचे कामावर पुनरागमन पाहून तिचे चाहते खूप आनंदी आहेत.
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक फॅन पेजेसने तो शेअर केला असून चाहते ऐश्वर्या राय कामावर परतली आहे. त्यामुळे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. मागील काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विवाहाबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दुबईमधील ग्लोबल वूमन्स फोरमच्या एका कार्यक्रमात ऐश्वर्याला फक्त ‘ऐश्वर्या राय’ म्हणून संबोधण्यात आले, ज्यामुळे तिच्या वैवाहिक स्थितीबाबत पुन्हा चर्चा रंगली.
ऐश्वर्या रायचा व्हायरल झालेला फोटो –
दरम्यान, ऐश्वर्याचे सासरे आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या अधिकृत ब्लॉगवर एका विस्तृत नोटमधून या चर्चांवर लिहीत आपले मत व्यक्त केले. त्यांनी कोणत्याही मुद्द्याचा स्पष्ट उल्लेख केला नसला तरी अनेकांनी याला ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या विवाहाबाबतच्या अफवांवर प्रतिक्रिया मानले आहे. या नोटमध्ये बिग बींनी सांगितले की, ते क्वचितच आपल्या कुटुंबाबद्दल सार्वजनिकपणे बोलतात, कारण त्यांना कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर आहे. तसेच, त्यांनी कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय त्या गोष्टींवर चर्चा करणाऱ्यांवर टीका केली आहे.
यापूर्वी, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या वेगळे होणार या अफवा उसळल्या होत्या. याला कारण म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला ते दोघे स्वतंत्रपणे उपस्थित राहिले होते. अभिषेक त्याच्या आई-वडिलांसह (अमिताभ आणि जया बच्चन) आणि बहिणी श्वेताबरोबर कार्यक्रमात पोहोचला होता, तर ऐश्वर्या तिची मुलगी आराध्याला घेऊन नंतर आली होती.