ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. २० एप्रिल २००७ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या व अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र, दोघांनी सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. दरम्यान ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या व अभिषेकच्या रोका विधीबाबत गंमतीशीर किस्सा सांगितला आहे.
ऐश्वर्या रायचा हा व्हिडिओ एका फॅन पेजने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. एका मुलाखती दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. दरम्यान या मुलाखतीत तिने तिच्या व अभिषेकच्या लग्नाच्या विधीसंबंधीत किस्सा सांगितला आहे. ऐश्वर्या म्हणाली, “माझ्या व अभिषेकच्या रोका समारंभासाठी जेव्हा अभिषेकचे कुटुंबीय माझ्या घरी येत असल्याचे मला समजले तेव्हा मला आश्चर्य वाटलं. अचानकपणे होणारा हा रोका विधी हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप आश्चर्यकारक होता. कारण आमच्या कुटुंबात कोणालाच या विधीचा अर्थही माहिती नव्हता.”
ऐश्वर्या पुढे म्हणाली, “माझं कुटुंब साऊथ पद्धतीचे कुटुंब आहे, त्यामुळे आमच्या कुटुंबात रोकासारखा कोणताही विधी नाही एक दिवस अचानक मला अभिषेकच्या घरून फोन आला की आम्ही येत आहोत. त्या दिवशी माझे वडीलही घरी नव्हते, ते गावाबाहेर होते आणि त्यांना यायला एक दिवस लागणार होता. मी अभिषेकला सांगितले की माझे वडील घरी नाहीयेत. यावर अभिषेक म्हणाला, ‘मी माझ्या घरच्यांना आता थांबवू शकत नाही, आम्ही निघालो आहोत आणि रस्त्यात आहोत. त्यादिवशी ते सगळे आमच्या घरी आले आणि आमचा रोका पार पडला.”
ऐश्वर्या रायच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिने मणिरत्नम यांच्या इरुवर या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदापर्ण केले. त्यानंतर तिने ५० हून अधिक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती शेवटची पोन्नियन सेल्वन २ या चित्रपटात दिसली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती.