ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai Bachchan) व अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) हे बॉलीवूडमधील लोकप्रिय आणि काही काळापासून सातत्याने चर्चेत राहिलेले जोडपे आहे. पती-पत्नी असण्याबरोबरच त्यांनी अनेक चित्रपटांत एकमेकांबरोबर सहकलाकार म्हणूनदेखील काम केले आहे. ‘धूम २’, ‘रावण’, ‘कुछ ना कहो’, अशा अनेक चित्रपटांत त्यांनी एकत्र काम केले आहे. आता ‘कुछ ना कहो’ चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन सिप्पी यांनी ऐश्वर्या व अभिषेक यांच्याबरोबर शूटिंगची आठवण सांगितली आहे.

काय म्हणाले दिग्दर्शक?

रोहन सिप्पी यांनी नुकतीच ‘फ्रायडे टॉकिज’ला मुलाखत दिली. यावेळी अभिषेक बच्चनबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, “अभिषेक बच्चनचा ‘रिफ्युजी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर ‘बस इतना सा ख्वाब है’ हा त्याचा नंतरचा चित्रपट होता. माझे त्याच्याबरोबर अनौपचारिक चांगले संबंध होते. तो खूप नवीन होता; तर दुसरीकडे ऐश्वर्या राय होती, जी त्यावेळी सुपरस्टार होती.”

पुढे बोलताना रोहन सिप्पी यांनी म्हटले, “अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चनसारखे कोणीही नाही. तिच्यासारखे फार कमी कलाकार आहेत. तिचे व्यक्तिमत्त्व विलक्षण आहे. मी तिच्याकडून खूप गोष्टी शिकलो आहे. ती कलाकार म्हणून उत्तम आहे. ती माझे ऐकायला तयार होती, या एका गोष्टीमुळे मला आत्मविश्वास आला. तिला अनुभव असल्यामुळे ती मला सांगू शकत होती. तिने मला खूप पाठिंबा दिला. जेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रात नवीन असता, तेव्हा या सगळ्याची तुम्हाला खूप मदत होते”, असे म्हणत रोहन सिप्पी यांनी ऐश्वर्या रायचे कौतुक केले आहे.

‘कुछ ना कहो’ या चित्रपटात अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्याशिवाय अरबाज खानदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो नुकताच ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि ऐश्वर्या राय बच्चन ‘पोन्नियिन सेल्वन २’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

हेही वाचा: “…आणि हे घडलं”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं…”

दरम्यान, ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांनी २० एप्रिल २००७ ला लग्नगाठ बांधली. त्यांना आराध्या मुलगीदेखील आहे. गेल्या काही काळापासून या जोडप्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. बच्चन कुटुंब व ऐश्वर्या राय यांच्यातील नातेसंबंध बिघडले असल्याचे म्हटले जात होते. मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने तिची मुलगी आराध्याबरोबर, तर संपूर्ण बच्चन कुटुंबाने एकत्र अशी वेगवेगळी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्यात दुरावा आला असल्याचा चर्चा वेगाने पसरल्या होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच अभिषेक व ऐश्वर्या या दोघांनी एका कार्यक्रमात एकत्र हजेरी लावली होती. त्यांनी त्यावेळी फोटोंसाठी एकत्र पोजदेखील दिल्याचे पाहायला मिळाले होते. आता हे दोन्ही कलाकार कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader