मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ट्रेलरनंतर आता या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. ‘जय श्री राम राजा राम’या ‘आदिपुरुष’चित्रपटातील पहिल्या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. हे गाणे अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले असून या गाण्याचे गीतकार मनोज शुक्ला आहेत. याबाबत आता संगीतकार अजय-अतुलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : “सगळ्या गोष्टींमध्ये फसवेन पण, प्रेमाच्या…” नवाजुद्दीन सिद्दिकीने वैयक्तिक आयुष्याबाबत केला खुलासा
मुंबईमध्ये अनोख्या पद्धतीने पहिले गाणे रिलीज करता यावे यासाठी ‘आदिपुरुष’च्या टीमने विशेष तयारी केली होती. अजय-अतुल यांच्यासह ३० जणांच्या कोरस टीमने लाइव्ह परफॉर्म केल्यावर हे गाणे लॉंच करण्यात आले. या वेळी अजय म्हणाला, “‘जय श्री राम’ या गाण्याच्या नावामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली. आदिपुरुषमधील हे गाणे आम्ही सर्वात आधी संगीतबद्ध केले. आम्हाला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा सर्वप्रथम सगळी माहिती घेतली. गाण्याला संगीत देताना आम्ही जेव्हा प्रभू श्री रामाचे नाव ऐकले तेव्हा आमच्यात वेगळीच शक्ती आणि भक्ती निर्माण झाली होती.”
हेही वाचा : ब्रेकअपच्या अफवा ऐकून करण कुंद्रा संतापला, म्हणाला, “तेजस्वी आणि माझ्यात…”
आदिपुरुषचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती. आता ‘जय श्री राम’ या गाण्याला सुद्धा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच दिग्दर्शक ओम राऊत, भूषण कुमार यांच्याबरोबर आम्ही यांनी मोठ्या भक्तिभावाने ‘जय श्री राम’ गाणे बनवले आहे, असेही अजय-अतुल यांनी या कार्यक्रमादरम्यान सांगितले.
दरम्यान, ‘आदिपुरुष’ चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. १६ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.